अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही भारत-रशिया मैत्री अतूट; उरल डिझाईन ब्युरोची भारतीय रणगाडा ताफ्याला नवसंजीवनी देण्याची तयारी
भारत आणि रशिया यांच्यातील ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंध नेहमीच दृढ राहिले असून, संकटसमयी दोन्ही देशांनी एकमेकांना खंबीर साथ दिली आहे. अमेरिकेने भारताकडून रशियन तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून २०० टक्के टॅरिफ लावून दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु या कठीण काळात रशियाने भारतासाठी आपली बाजारपेठ खुली करत मैत्रीचा नवा आदर्श घालून दिला. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान मोठ्या संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या, ज्याने जागतिक राजकारणाचे लक्ष वेधून घेतले. याच पार्श्वभूमीवर, रशियाने आता भारतीय लष्कराची ताकद थेट दुप्पट करणारा एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा प्रस्ताव भारताला दिला आहे.
रशियाच्या अग्रगण्य रणगाडा डिझायनर कंपनीने भारतीय लष्करातील ३,६०० हून अधिक रशियन बनावटीच्या रणगाड्यांना (ज्यामध्ये प्रामुख्याने T-72 आणि T-90 रणगाड्यांचा समावेश आहे) अत्याधुनिक पद्धतीने अपग्रेड करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे रणगाडे भारतात गेल्या अनेक दशकांपासून परवान्याअंतर्गत (License Production) उत्पादित केले जात आहेत. ‘उरल डिझाइन ब्युरो ऑफ ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंग’चे महासंचालक आणि मुख्य डिझाइनर आंद्रेई तेर्लिकोव्ह यांनी या आधुनिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी सहकार्याची तयारी दर्शवली आहे. हा प्रस्ताव स्वीकारल्यास भारतीय लष्कराच्या ताफ्यातील रणगाड्यांची मारक क्षमता आणि रणांगणातील सुरक्षा कमालीची वाढणार आहे.
यापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमांमध्ये रशियाने पुरवलेल्या शस्त्रास्त्रांच्या बळावर भारताने शत्रूचे मनसुबे हवेतच उधळून लावले होते आणि पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. आता चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांच्या आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताच्या या ३,६०० रणगाड्यांना रशियन तंत्रज्ञानाची जोड मिळणे हे संरक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. दोन्ही देशांमधील हे नवे संरक्षण सहकार्य केवळ मैत्रीचे प्रतीक नसून भारतीय लष्कराला भविष्यातील युद्धांसाठी सज्ज करणारे ठरणार आहे.




