मुंबईतील मीरा रोड परिसरात बकरा कुर्बानीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद शांत होत असतानाच आता घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीतही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोसायटीमध्ये अनेक वर्षांपासून बकरा कुर्बानीची परंपरा सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, यंदा अचानक मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी नाकारण्यात आल्याने रहिवाशांमध्ये नाराजी पसरली असून यावरून वाद निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात शांततेची भूमिका घेतली असून सोसायटी परिसरात कुर्बानी न करण्याची तयारी दर्शवली आहे. “आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही तिथे धार्मिक विधी पार पाडू,” अशी भूमिका काही रहिवाशांनी मांडली. सोसायटीचे नाव वादात ओढले जाऊ नये, अशी भावना देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या संवेदनशील प्रकरणामुळे प्रशासन सतर्क झाले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही सागर पार्क सोसायटी परिसरात दाखल झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत गस्त घालण्यात येत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
या घडामोडींमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी सागर पार्क परिसराला भेट देणार असल्याची घोषणा केली असून त्याआधीच सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. सोमय्या यांनी सोसायटी परिसरात यापुढे कुर्बानी होऊ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच महापालिकेकडून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्बानीसाठी आणलेल्या 31 बोकडांपैकी 23 बोकड मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे घाटकोपरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.




