१४ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संघटित टोळीवर कायद्याचा बडगा; एकाच दिवशी केल्या होत्या तीन चोऱ्या
विजय गायकवाड – नवी मुंबई
ऐरोली आणि घणसोली परिसरात एकट्या-दुकट्या ज्येष्ठ महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या एका धोकादायक टोळीचा रबाळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या संघटित गुन्हेगारी टोळीच्या वाढत्या कारवाया लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मोक्का – MCOCA) अंतर्गत अत्यंत कडक कारवाई केली आहे.
या टोळीने २४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ऐरोली आणि घणसोली परिसरात अवघ्या काही तासांच्या अंतरात तब्बल तीन महिलांना लुटले होते: ऐरोली सेक्टर-२ मधील प्रियांका हॉटेलजवळ एका महिलेला चाकूचा धाक दाखवून ५ ग्रॅमची सोन्याची पोत पळवली. घणसोली तळवली गावातील मनपा शाळेसमोरून ७ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. ऐरोली गावातून एका महिलेची २० ग्रॅमची सोन्याची जिरा माळ पळवून नेली.
या गंभीर चोऱ्यांनंतर रबाळे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करून गुन्ह्याची उकल केली. पोलिसांनी या प्रकरणी खालील आरोपींना अटक केली आहे:
१. आयुष अर्जुन देटके (रा. नेरुळ)
२. अर्जुन बाबू चव्हाण (रा. मानखुर्द)
३. अपर्णा संदीप आवळे (रा. गोवंडी)
४. तक्तसिंग प्रेमसिंग राठोड (व्यवसाय- ज्वेलर्स, मानखुर्द – जो चोरीचे सोने विकत घ्यायचा)
या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या टोळीचा मुख्य सूत्रधार अविनाश सुनील शिशुपाल याच्यासह त्याचे साथीदार अनिकेत शिशुपाल आणि मोहम्मद शाहबाज खान हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तपासादरम्यान समोर आले आहे की, मुख्य आरोपी अविनाश शिशुपाल आणि त्याच्या टोळीवर मुंबई व नवी मुंबई परिसरात तब्बल १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने आतापर्यंत विविध गुन्ह्यांतून सुमारे १८ लाख ८३ हजार रुपयांची लूट केली असून, त्यापैकी ९ लाख ४३ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांत जप्त केला आहे.
टोळीची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटित स्वरूप पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ लावण्याचा प्रस्ताव तयार केला. नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा टोळ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.




