spot_img

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : महापालिका मतदानाच्या तोंडावर ठाण्यात राजकीय रणकंदन, घरोघरी प्रचारावरून वाद

spot_img

प्रचारबंदीच्या निर्णयावर विरोधकांचा आक्षेप, प्रभाग 6 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला अवघा एक दिवस उरलेला असतानाच राजकीय वातावरण तापलं आहे. अधिकृत प्रचाराची मुदत संपली असली तरी राजकीय नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप थांबलेले नाहीत. निवडणूक आयोगाने उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी दिल्यामुळे विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या निर्णयावर टीका करताना शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. “प्रचार संपल्यानंतर तो पूर्णपणे थांबतो, ही परंपरा होती. मात्र आता प्रचारबंदी असूनही घरोघरी प्रचार सुरू आहे. सध्या पैशांचे वाटप साड्यांमधून, वृत्तपत्रांमधून होत असल्याचे चित्र आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये वादाला तोंड फुटलं आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते EVM मशीनचा डेमो दाखवत घरोघरी प्रचार करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. पैशांचे वाटप होत असल्याच्या संशयावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि धक्काबुक्कीची घटना घडली.

या प्रभागात ठाकरे गटाच्या उमेदवार पूजा आवारे तर शिंदे गटाच्या सरिता ठाकूर निवडणूक रिंगणात आहेत. सरिता ठाकूर यांचे पती आणि माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यकर्ते वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, सध्या तेथे तणावपूर्ण वातावरण आहे. घडलेल्या प्रकाराची चौकशी महापालिका निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडून सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ