हंगामी लाल गाजर आणि वर्षभर मिळणारी केशरी गाजरे, दोन्हींचे वेगवेगळे फायदे; आरोग्यासाठी काय निवडावे?
हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात गाजरांची रेलचेल असते. गाजराचा रस, गाजराचा हलवा, सॅलड किंवा विविध मिष्टान्न—हिवाळ्यात गाजरांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, बाजारात लाल आणि केशरी असे दोन प्रकारचे गाजर उपलब्ध असल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की नेमके कोणते गाजर अधिक फायदेशीर आहे?
लाल गाजर प्रामुख्याने हिवाळ्यातच उपलब्ध असतात. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत मिळणारी ही गाजरे पोषणमूल्यांनी समृद्ध मानली जातात. लाल गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. थंडीत होणाऱ्या आजारांपासून संरक्षणासाठी लाल गाजरांचा नियमित आहार फायदेशीर ठरतो.
याशिवाय, लाल गाजरांमध्ये फायबर जास्त असल्याने चयापचय क्रिया वेगवान होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्यातील लाइकोपीन हा प्रभावी अँटीऑक्सिडंट हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून शरीरातील घातक घटकांशी लढण्यास मदत करतो.
दुसरीकडे, केशरी रंगाची गाजरे वर्षभर सहज उपलब्ध असतात. या गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य, त्वचा आणि प्रतिकारशक्तीसाठी केशरी गाजरे लाभदायक मानली जातात. तसेच, व्हिटॅमिन ए आणि ई मुळे हाडे मजबूत होतात आणि त्वचेच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते. केशरी गाजरांमधील अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात, त्वचा तजेलदार ठेवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास सहाय्यक ठरतात.
एकूणच पाहता, लाल आणि केशरी दोन्ही गाजरे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. हिवाळ्यात लाल गाजरांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तर वर्षभर केशरी गाजरे डोळे, त्वचा आणि हाडांसाठी फायदेशीर ठरतात. योग्य प्रमाणात दोन्ही प्रकारची गाजरे आहारात घेतल्यास आरोग्य अधिक चांगले राहू शकते.




