227 वॉर्डसाठी भाजप 140, शिंदे गट 87 जागांवर लढणार; ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची कसोटी
मुंबई महानगरपालिका नि वडणूक ही नेहमीच राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरते. राज्यात सत्ता नसली तरी मुंबई महापालिकेवर वर्चस्व असणं म्हणजे राजकीय ताकदीचं मोठं प्रतीक मानलं जातं. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील बहुचर्चित जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात सलग बैठकांचं सत्र सुरू होतं. अखेर 227 वॉर्ड असलेल्या मुंबई महापालिकेत भाजप 140 जागांवर, तर शिवसेना शिंदे गट 87 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं जवळच्या सूत्रांकडून समजतं. आरपीआयला देखील भाजपच्या कोट्यातून काही जागा देण्यात येणार आहेत. भाजपचा 150 जागांचा आग्रह होता, मात्र अखेरीस 140 जागांवर समाधान मानावं लागल्याचं बोललं जात आहे.
2022 मध्ये शिवसेनेतील फाटाफुटीनंतर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे गेला, तर उद्धव ठाकरे यांना मशाल हे नवीन चिन्ह स्वीकारावं लागलं. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसला असून संपूर्ण राज्यात त्यांचे केवळ 20 आमदार निवडून आले. मुंबईत सध्या भाजपचे 15, उद्धव ठाकरे गटाचे 10, तर शिंदे गटाचे 6 आमदार आहेत.
पूर्वी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानली जाणारी मुंबई आता तशी राहिलेली नाही. भाजपने शहरात भक्कम पाय रोवले आहेत आणि शिंदे गटानेही आपली उपस्थिती मजबूत केली आहे. त्यामुळे ही पालिका निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई ठरण्याची चिन्हं आहेत.
अलीकडे झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. विशेषतः उद्धव ठाकरे गटाची कामगिरी अत्यंत सुमार ठरली. अशा परिस्थितीत समोर भाजप आणि शिंदे गटासारख्या बलाढ्य युतीचं आव्हान असल्याने ठाकरे गटासाठी मुंबई महापालिका जिंकणं सोपं नसेल.
दरम्यान, विधानसभा निहाय कोणत्या वॉर्डातून कोण उमेदवार उतरणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी भाजप–शिंदेसेना युती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार हे मात्र निश्चित मानलं जात आहे.




