बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी, पुढील तारखेवर पुराव्यांचा टप्पा सुरू होणार
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या या हत्येचे काही फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून उर्वरित सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. घटनेनंतर राज्यभर जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले, तर बीड जिल्ह्यातील वातावरण दीर्घकाळ तणावपूर्ण राहिले.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वतःकडे घेतले. तर या प्रकरणात नाव आल्याने आणि आरोपांच्या भोवऱ्यात सापडल्याने धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली.
आज या बहुचर्चित प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि ॲड. बाळासाहेब कोल्हे न्यायालयात उपस्थित होते. सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींवरील आरोपांचा मसुदा वाचून दाखवला. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.
सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, “आज न्यायालयाने अखेर आरोप निश्चित केले आहेत. खंडणी मिळवण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. आरोपींच्या वकिलांकडून खटल्यात वारंवार विलंब घडवून आणण्याचा आणि प्रकरण भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
ते पुढे म्हणाले की, लवकरच प्रत्यक्ष पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू होईल. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात असो वा अन्य कोणत्याही न्यायालयात, तो लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




