spot_img

Nagar Parishad Election Results 2025 : नगर परिषद–नगर पंचायत निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, महायुतीचं वर्चस्व स्पष्ट

spot_img

पहिल्या दहा मिनिटांत भाजपची मोठी मुसंडी; काँग्रेसचा बेस कायम, तर ठाकरे–शरद पवार गट पिछाडीवर

राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू होताच अवघ्या दहा मिनिटांतच राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने दमदार कामगिरी करत आघाडी घेतली असून शिंदे गट आणि अजित पवार गट त्यापाठोपाठ असल्याचं दिसत आहे.

पहिल्या टप्प्यातील आकडेवारीनुसार भाजप 111 जागांवर आघाडीवर आहे. शिंदे गट 39 तर अजित पवार गट 31 जागांवर पुढे आहे. काँग्रेसनेही 37 जागांवर आघाडी घेत आपला परंपरागत मतदार आधार अजूनही मजबूत असल्याचं दाखवून दिलं आहे. मात्र ठाकरे गट केवळ 5 आणि शरद पवार गट 9 जागांवर आघाडीवर असल्याने महाविकास आघाडीची सुरुवात निराशाजनक ठरली आहे.

एकत्रित चित्र पाहिलं तर महायुती 181 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी 50 जागांवर पुढे आहे. स्थानिक आघाड्यांनी सहा जागांवर आघाडी घेतली आहे. हे सर्व आकडे प्राथमिक स्वरूपाचे असून दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निकाल समोर येणार आहेत.

या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना कमी ठिकाणी दिसला. अनेक ठिकाणी महायुतीतीलच पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिल्यामुळे बहुरंगी लढती पाहायला मिळाल्या. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते.

प्रचाराच्या आघाडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जोरदार सभा घेत वातावरण तापवलं. याउलट महाविकास आघाडीचे प्रमुख नेते फारसे सक्रिय दिसले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी एकही सभा न घेतल्याने आणि शरद पवार यांच्या मर्यादित उपस्थितीमुळे आघाडीला अपेक्षित हवा तयार करता आली नाही.

या निवडणुकीत राणे कुटुंब, एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, गोपिचंद पडळकर, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे अंतिम निकालात कोण आपला गड राखतो आणि कोणाला धक्का बसतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ