मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गैरहजर; त्यांच्या जागी भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा आरोप, पक्षात सुरू चर्चेला उधाण
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून सर्वच पक्षांनी तयारीचा वेग वाढवला आहे. भाजपकडून विभागनिहाय आढावा बैठका पार पडल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सुद्धा रणसज्ज झाला आहे. स्वतः पक्षप्रमुख शरद पवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय बैठक घेत आहेत.
मात्र, अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्हा संघटनेतून एक आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीसाठी सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल अनुपस्थित राहिले, आणि त्यांच्या जागी त्यांनी भाजप कार्यकर्त्याला प्रतिनिधी म्हणून पाठवले, असा आरोप पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी केला आहे.
सदर कार्यकर्त्याचे नाव महेश गाडेकर असे असून, ते भाजपशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी खरटमल यांना स्पष्टीकरण विचारले. त्यावर खरटमल यांनी गाडेकर हे प्रत्यक्षात राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असल्याचा दावा करत, “माझं तिकीट निश्चित झालं नव्हतं, त्यामुळे माझ्या वतीने माझे मित्र गाडेकर यांना पाठवलं,” असे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, या प्रकरणावर पक्षात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. भाजप कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या बैठकीत पाठवण्याच्या या आरोपामुळे सोलापुरात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.




