‘मनसे रेल्वे कामगार सेने’च्या मेळाव्यात राज ठाकरेंची चौफेर टोलेबाजी; एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि ब्रिटिशकालीन पुलांचे दाखले देत निकृष्ट कामांवरून सरकारवर डागली तोफ
“या देशात सध्या काय चाललंय काही सांगता येत नाही. कुणाचं काम कोण बोलतंय? नितीन गडकरी हे ट्रान्सपोर्ट (वाहतूक) मंत्री आहेत. पण पेट्रोलमध्ये इथेनॉल कसं घातलं पाहिजे, यावर पेट्रोलियम मंत्री ब्र शब्द काढत नाहीत आणि गडकरी त्यावर प्रवचन देतात,” अशा अत्यंत खोचक शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत आयोजित ‘महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेने’च्या १९ व्या वर्धापन दिन मेळाव्यात ते बोलत होते. नेहमी गडकरींच्या कामाचे कौतुक करणाऱ्या राज ठाकरेंनी आज थेट त्यांच्यावरच निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत बोलताना राज ठाकरेंनी केवळ गडकरींवरच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या भूमिकेवरही कडक शब्दांत प्रहार केला. “आमचे मुख्यमंत्री थेट ‘बघून घेण्याची’ भाषा करतात,” असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडत, “जर राम मंदिरात चोरी झाली असती आणि देशात भाजपची सत्ता नसती, तर याच भाजपने काय गदारोळ केला असता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भारतातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या निकृष्ट दर्जावर बोट ठेवताना राज ठाकरेंनी अमेरिका आणि ब्रिटिशांच्या काळातील बांधकामांचे रंजक दाखले दिले. “अमेरिकेतील ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’ १९३३ साली अवघ्या १४ महिन्यांत बांधली गेली. ११० मजल्यांची ही इमारत अतिशय विस्तीर्ण आहे. तिथे तळमजल्यावर बॉम्बस्फोट झाला, एक छोटे विमानही त्यावर आदळले, तरीही ती इमारत आजही ताठ मानेने उभी आहे. तिला काहीही झालेले नाही.” “ब्रिटिशांनी भारतात आणि जगावर १५० वर्षे राज्य केले. त्यांनी बांधलेले पूल आजही मजबूत आहेत. गंमत म्हणजे, आजही इंग्लंडवरून भारत सरकारला पत्रे येतात की, ‘आम्ही अमुक ठिकाणी बांधलेल्या पुलाची १०० वर्षांची गॅरंटी संपली आहे, आता तो तुम्ही सांभाळा.’ ज्या ज्या देशात त्यांनी राज्य केले, तिथे ते आजही अशी पत्रे प्रामाणिकपणे पाठवतात.”
परदेशातील या दर्जेदार कामांची तुलना आपल्या व्यवस्थेशी करताना राज ठाकरे संतापले. “तिथली कामे शंभर-शंभर वर्षे टिकतात, पण आपल्याकडे काय परिस्थिती आहे? आमच्या रस्त्याला लगेच खड्डे का पडतात?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वाहतूक आणि पेट्रोलियम खात्याच्या कामातील गल्लत दाखवून देत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रेल्वे कामगारांच्या या मेळाव्यात राज ठाकरेंनी विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या राजकारणावर आणि नेत्यांच्या विधानांवर मनसोक्त टोलेबाजी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.




