भगवान शिवशंकरांचे निवासस्थान आणि नैसर्गिक आव्हाने; ५३ वर्षीय अरुण कुमार तिवारी यांच्या निधनाने हळहळ
जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’ सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. हैदराबादचे ५३ वर्षीय अनुभवी गिर्यारोहक अरुण कुमार तिवारी यांनी हे स्वप्न पूर्ण तर केले; मात्र दुर्दैवाने शिखरावरून खाली उतरत असताना त्यांना मृत्यूने गाठले. गेल्या आठवड्यात २१ मे रोजी शिखरापासून काही अंतरावर खाली असलेल्या ‘हिलरी स्टेप’ जवळ त्यांचा मृत्यू झाला. या अत्यंत कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाने एक अत्यंत भावुक आणि मोठा निर्णय घेतला आहे. अरुण कुमार यांचा मृतदेह भारतात परत न आणता तो एव्हरेस्टवरच कायमचा सोडण्याचा निर्णय त्यांच्या परिवाराने घेतला आहे.
अरुण कुमार यांचे मेहुणे सुधीर उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, माउंट एव्हरेस्ट हे भगवान शिवशंकरांचे निवासस्थान (पवित्र स्थान) आहे, अशी त्यांच्या कुटुंबाची तीव्र श्रद्धा आहे. त्यामुळे अरुण कुमार यांनी आपल्या लाडक्या शिखरावर आणि महादेवाच्या चरणाशीच कायमस्वरूपी राहावे, ही कुटुंबाची भावना आहे. एव्हरेस्टच्या अतिउंचावरील ‘डेथ झोन’ आणि हिलरी स्टेपसारख्या धोकादायक ठिकाणाहून मृतदेह सुरक्षित खाली आणणे अत्यंत कठीण आणि जीवघेणे असते. बदलणारे हवामान आणि नैसर्गिक आव्हानांमुळे इतर कोणाचा जीव धोक्यात येऊ नये, म्हणून कुटुंबाने हा प्रॅक्टिकल निर्णय घेतला.
अरुण कुमार तिवारी हे व्यवसायाने हैदराबादमध्ये एक सिनियर आयटी प्रोफेशनल (IT Professional) होते. त्यांना ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाचा दांडगा अनुभव होता. गेल्या वर्षी देखील त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रतिकूल हवामानामुळे त्यांना अपयश आले होते. हार न मानता त्यांनी यंदा पुन्हा तयारी केली आणि २१ मे रोजी जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवून आपले स्वप्न पूर्ण केले.
मात्र, निसर्गाची परीक्षा पाहणाऱ्या या शिखरावरून खाली उतरत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्यासोबत मदतीसाठी चार शेरपा गिर्यारोहक हजर होते, परंतु अत्यंत कमी ऑक्सिजन आणि कडाक्याच्या थंडीमुळे त्यांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने संपूर्ण गिर्यारोहक क्षेत्रात आणि तेलंगणामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.




