२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञान यामधील संघर्ष प्रभावीपणे मांडत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ या बहुचर्चित सिक्वेलनेही प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचा पहिला शो शुक्रवारी नव्हे तर गुरुवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी सहा वाजता प्रदर्शित करण्यात आला आणि या अनोख्या वेळेलाही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली.
पुणे, मुंबई, नाशिक, पिंपरी-चिंचवड, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांमध्ये चित्रपटाचे शो पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाले. मुंबईतील भांडुप, अंधेरी, ठाणे, कल्याण, नालासोपारा आणि लोअर परळ परिसरातही चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसला. ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवरही तिकिटांसाठी मोठी झुंबड उडाली. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चित्रपटातील कथानक, संवाद, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे.
पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सुमारे ५०० चित्रपटगृहांमध्ये दोन हजारांहून अधिक शो प्रदर्शित करण्यात आले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये तब्बल २५ शो हाऊसफुल्ल झाल्याने चित्रपटाच्या लोकप्रियतेची जोरदार चर्चा रंगली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळालेला हा प्रतिसाद विक्रमी मानला जात असून, ‘देऊळ बंद २’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.




