पारंपरिक पिनअपला फाटा देत महिलांनी निवडला कम्फर्टेबल आणि मॉडर्न लूक; उन्हाळ्यात फॅशन इन्फ्लुएन्सर्सची पहिली पसंती
साडी नेसण्याची पारंपरिक पद्धत, ज्यात पदराच्या परफेक्ट प्लेट्स पाडून तो चापून-चोपून पिनअप केला जायचा, त्याला आता आधुनिक फॅशनमध्ये नवा पर्याय मिळाला आहे. हल्ली महिलांमध्ये परफेक्ट लुकपेक्षा ‘कम्फर्ट आणि फ्लोई’ (आरामदायी आणि नैसर्गिक) लूकला अधिक पसंती दिली जात आहे. याच फॅशन ट्रेंडचा एक भाग म्हणून सध्या सोशल मीडिया आणि सेलिब्रिटी लुक्समध्ये “लेझी पल्लू” (Lazy Pallu) स्टाईलची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. ही स्टाईल दिसायला अत्यंत साधी आणि सरळ असली, तरी ती साडीला एकदम क्लासी आणि मॉडर्न लुक देते.
‘लेझी पल्लू’ म्हणजे साडीचा पदर अगदी घट्ट आणि व्यवस्थित प्लेट्समध्ये न बांधता, थोडासा सैल आणि नॅचरल पद्धतीने खांद्यावर सोडणे. यामध्ये जास्त पिनअप किंवा परफेक्ट फोल्ड्स नसतात, ज्यामुळे संपूर्ण लूक रिलॅक्स आणि स्टायलिश दिसतो. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत जड साड्या किंवा कडक पिनअप सांभाळणे त्रासदायक ठरते; अशा वेळी ही हलकी स्टाईल अत्यंत आरामदायी ठरते. ही फॅशन कॉटन, लिनन, मलमल, हँडलूम, कॉटन सिल्क आणि ऑर्गेन्झा साड्यांवर सर्वात जास्त उठून दिसते. सध्याच्या ‘एफर्टलेस फॅशन’ (Effortless Fashion) च्या युगात जास्त तामझाम न करता स्टायलिश दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री आणि साडी लव्हर्स या ट्रेंडकडे वळत आहेत.
हा लूक करताना पदर खूप जास्त सैल सोडू नये, तसेच यावर स्लीव्हलेस किंवा डीप नेक ब्लाऊज, मिनिमल (कमीतकमी) ज्वेलरी आणि हलका मेकअप केल्यास साडीचा लुक अधिक आकर्षक दिसतो.




