Mouni Roy-Suraj Nambiar relationship timeline : मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर पती सूरजने मौन सोडले

spot_img

पोटगी, वाद आणि तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाच्या चर्चा सूरजने फेटाळल्या

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक संयुक्त निवेदन जारी करत आपण विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात असून, अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः मौनीची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री दिशा पटानी हिच्यासोबतच्या मैत्रीवरून मौनीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. या सर्व प्रकाराला वैतागून अखेर सूरज नांबियारने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भलीमोठी पोस्ट शेअर करत या अफवांचा जोरदार शब्दांत समाचार घेतला आहे. त्याने या पोस्टच्या माध्यमातून पोटगी, वाद आणि कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा या घटस्फोटात असलेला सहभाग, हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

सूरजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मौनी आणि माझ्या विभक्त होण्याच्या निर्णयावर ज्या काही मनघडंत आणि तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या अत्यंत चुकीच्या आणि द्वेषपूर्ण आहेत. मी याविषयी एकदाच आणि शेवटचे स्पष्ट करू इच्छितो की, आमच्यात कोणताही वाद नाही आणि इथे कोणत्याही प्रकारची पोटगी (Alimony) मागितली गेलेली नाही. तसेच या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग किंवा दोष नाही. आम्ही दोघांनी एकमेकांविषयी आदर ठेवून आणि परस्परांच्या भल्याचा विचार करूनच हा अत्यंत कठीण निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त जे काही पसरवले जात आहे, ते केवळ काल्पनिक असून दोन व्यक्तींना जाणूनबुजून बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.”

पुढे बोलताना सूरजने दिशा पटानीच्या ट्रोलिंगचा अप्रत्यक्ष संदर्भ देत इतर मित्रांना या वादात ओढण्यावर तीव्र आक्षेप घेतला. तो म्हणाला, “आमच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयात आमच्या निर्दोष मित्रमैत्रिणींना ओढणे अत्यंत चुकीचे आहे, ज्यांचा याच्याशी दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही. माध्यमांनी कोणतीही पडताळणी न करता अशा कथा रंगवल्या आहेत, ज्या कधी घडल्याच नव्हत्या. जर कोणी आमच्याबद्दल जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवत असेल, तर मी शांत बसणार नाही.” शेवटी, आम्ही दिलेल्या संयुक्त निवेदनाचा प्रत्येकाने आदर करावा आणि आम्हाला शांततेने आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेळ द्यावा, अशी कळकळीची विनंती सूरजने माध्यम आणि नेटकऱ्यांना केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ