क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याचा (Obstructing the Field) ठपका ठेवत रघुवंशीला दिलं बाद
आयपीएल २०२६ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातील लढत एका विचित्र आणि ऐतिहासिक घटनेमुळे चर्चेत आली आहे. कोलकात्याची फलंदाजी सुरू असताना, युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी याला ज्या पद्धतीने बाद देण्यात आले, त्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आयपीएलच्या इतिहासात ‘क्षेत्ररक्षणात अडथळा’ (Obstructing the Field) निर्माण केल्यामुळे बाद होणारा अंगकृष हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या निर्णयामुळे केवळ मैदानावरील खेळाडूच नाही, तर केकेआरचे मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफ देखील थक्क झाला असून त्यांनी पंचांकडे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
नेमकं प्रकरण असं घडलं की, लखनौचा गोलंदाज प्रिन्स यादव पाचवे षटक टाकत होता. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अंगकृषने मिड-ऑनच्या दिशेने फटका मारला आणि धाव घेण्यासाठी तो क्रीज सोडून बाहेर धावला. मात्र, समोरून कॅमरून ग्रीनने धाव घेण्यास नकार दिला. धाव पूर्ण होणार नाही हे लक्षात येताच अंगकृष माघारी फिरला. माघारी परतत असताना त्याने एक उडी मारली, मात्र त्याच वेळी क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू त्याच्या अंगाला लागला. लखनौच्या खेळाडूंनी, विशेषतः मोहम्मद शमीने तातडीने अपील केली. मैदानी पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला आणि रिप्लेमध्ये असे दिसून आले की, अंगकृषने धावताना आपली दिशा बदलली होती, ज्यामुळे चेंडू अडला गेला. नियमानुसार ही कृती क्षेत्ररक्षणात अडथळा मानली गेली आणि त्याला बाद ठरवण्यात आले.
पंचांच्या या निर्णयामुळे मैदानात मोठा गदारोळ झाला. केकेआरचे प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी चौथ्या पंचांशी बराच वेळ वाद घातला, पण नियमापुढे कोणाचेही काही चालले नाही. अंगकृष स्वतः या निर्णयावर कमालीचा संतापलेला दिसला. सीमारेषेबाहेर जाताना त्याने संतापून आपले हेल्मेट फेकून दिले आणि बॅटही जोरात हवेत फिरवली. पॉवरप्लेच्या सहा षटकात अवघ्या ३१ धावांवर ३ गडी गमावल्याने कोलकाता संघ प्रचंड दबावाखाली आला असून, या वादग्रस्त विकेटने सामन्याला एक वेगळंच वळण दिलं आहे.




