राज्याच्या राजकारणात सध्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद अधिकच तीव्र होताना दिसत आहे. काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतही दोघांमधील मतभेद उघडपणे दिसून आले होते.
दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णयही वादाच्या केंद्रस्थानी आहे. या निर्णयामुळे काही संघटना आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आमदार नरेंद्र मेहता यांनी सरनाईक यांच्यावर थेट आरोप करत राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.
मेहता यांनी ठाणे परिसरातील कासारवडवली भागातील भाईंदरपाडा येथे असलेल्या एका कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, भोईर कुटुंबाच्या सुमारे 2,439 चौरस मीटर जमिनीतून मोठा हिस्सा बळकावण्यात आला आहे. जवळपास 1,219 चौरस मीटर जागेवर अतिक्रमण करून ती हडपण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मेहता यांनी आपल्या समर्थकांसह थेट कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी संबंधित जागेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या आरोपांमुळे सरनाईक-मेहता वाद अधिकच चिघळण्याची शक्यता असून, पुढील काळात या प्रकरणावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




