नागपूरमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ज्यांना बागेश्वर बाबा म्हणून ओळखले जाते, यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत एक कथा सांगितली. या कथेत शिवाजी महाराजांनी युद्धामुळे थकवा आल्यावर आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी ठेवत राज्यकारभार सोपवण्याची विनंती केली, असे त्यांनी म्हटले.या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विशेषतः इतिहासाशी विसंगत आणि दिशाभूल करणारे विधान केल्याचा आरोप करत विरोधकांनी बागेश्वर बाबांवर निशाणा साधला आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ज्या भूमीतून बागेश्वर बाबा येतात, त्या प्रदेशातील छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा मिळाली होती. मात्र स्वतःच्या इतिहासाची अचूक माहिती नसताना महाराष्ट्रात येऊन चुकीचा इतिहास सांगणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
संभाजीराजे यांनी पुढे असेही म्हटले की, अशा प्रकारच्या भ्रामक वक्तव्यांमुळे लोकांची दिशाभूल होते आणि अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणे चुकीचे आहे. त्यांनी राज्य सरकारने अशा वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी तसेच त्यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सामाजिक आणि राजकीय पातळीवर चर्चा रंगली असून, पुढे यावर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




