कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात पुरोगामी संघटनांनी राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडत आपला संताप व्यक्त केला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अनेक कार्यकर्ते एकत्र जमले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सुरुवातीला आंदोलन शांततेत सुरू असले, तरी काही वेळातच वातावरण तणावपूर्ण बनले.
आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केली. “कोल्हापूर पोलिसांचा धिक्कार असो” अशा घोषणा देत त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की आणि किरकोळ झटापट झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे परिसरातील तणाव अधिकच वाढला आणि काही काळ परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसून आली.
यावेळी आंदोलकांनी आमदार गायकवाड यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, आंदोलकांकडून प्रतीकात्मक पुतळा दहन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. पुतळा दहनास परवानगी नसल्याचा इशारा देत पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही काही कार्यकर्ते पुतळा दहनासाठी पुढे सरसावल्याने परिस्थिती काही काळ अत्यंत तणावपूर्ण बनली. सध्या पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, परिसरात अजूनही कडेकोट बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.




