महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या ९ पैकी ८ खासदारांशी संपर्क साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या कथित ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे गटात पुन्हा मोठी गळती लागणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, खासदार संजय राऊत यांनी यावर अत्यंत खोचक आणि प्रखर शब्दांत पलटवार केला आहे. “शिंदे गटाची अवस्था सध्या ‘डेडबॉडी’सारखी झाली असून, त्यांचं खरं ऑपरेशन तर देवेंद्र फडणवीस करत आहेत,” अशा शब्दांत राऊतांनी या चर्चांचा धुराळा उडवून दिला.
शिंदे यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या खासदारांची गुप्त भेट घेतल्याच्या वृत्तावर बोलताना संजय राऊत यांनी कमालीचा संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “ऑपरेशन एकदाच केले जाते, जे वारंवार केले जाते ते जिवंत माणसाचे नाही तर ‘डेडबॉडी’चे असते.” सध्या शिंदे गटाची राजकीय अवस्था फडणवीसांच्या हातात असलेल्या मृतदेहासारखी झाली असल्याची टीका त्यांनी केली. ९ खासदार फुटणार या बातम्यांना ‘मूर्खपणा’ संबोधत त्यांनी स्पष्ट केले की, ज्यांनी ही बातमी पेरली आहे त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले आहे. उद्या हे लोक आदित्य ठाकरेंचे किंवा माझेही नाव अशा याद्यांत टाकतील, असे म्हणत त्यांनी या बातम्या केवळ वातवरण गरम करण्यासाठी पेरल्या जात असल्याचा आरोप केला.
केवळ राजकीय टीका करून न थांबता राऊत यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना डावलले जात असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. “विरोधकांच्या मतदारसंघातील विकासाचा निधी रोखणे हा सामाजिक अपराध आहे. हा पैसा काय तुमच्या बापाच्या खिशातला आहे का?” असा तिखट सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जर राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेण्याचे स्वप्न पाहिले असेल, तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडून विरोधकांनाही समान न्याय देण्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. केंद्रात मोदी आहेत तोपर्यंतच फडणवीसांचे महाराष्ट्रातील राजकारण टिकून आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी शेवटी केली.




