आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणांनाही विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वयाची तिशी ओलांडल्यानंतर महिला आणि पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक ठरते. शरीरात या वयानंतर अनेक बदल होऊ लागतात, ज्यामुळे काही आजारांचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने तिशीनंतर कोणत्या हेल्थ टेस्ट नियमित कराव्यात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
ब्लड प्रेशर तपासणी:
तिशीनंतर उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे दर सहा महिन्यांनी ब्लड प्रेशर तपासणं आवश्यक आहे. याशिवाय ECG आणि लिपिड प्रोफाइलसारख्या चाचण्या केल्यास हृदयाच्या स्थितीबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळते.
डायबिटीस तपासणी:
आजकाल तरुणांमध्येही डायबिटीसचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वयाच्या 30 नंतर फास्टिंग ब्लड शुगर आणि HbA1c या चाचण्या नियमित करणे गरजेचे आहे.
थायरॉईड चाचणी:
सतत थकवा जाणवणे, केस गळणे किंवा वजनात अचानक बदल होणे ही थायरॉईड असंतुलनाची लक्षणं असू शकतात. त्यामुळे ही तपासणी वेळोवेळी करणे महत्त्वाचे ठरते.
कॅन्सर स्क्रिनिंग:
तिशीनंतर काही प्राथमिक कॅन्सर तपासण्या करणं आवश्यक आहे. महिलांनी पॅप स्मियर आणि स्तन तपासणी, तर पुरुषांनी प्रोस्टेटसंबंधित तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.
व्हिटॅमिन चाचण्या:
व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12 यांची कमतरता अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे या चाचण्या करून योग्य वेळी उपचार घेणं फायदेशीर ठरतं.
या सर्व तपासण्या खर्चिक नसून कमी वेळात करता येतात. त्यामुळे 30 नंतर निरोगी राहण्यासाठी या हेल्थ टेस्ट नियमित करणं आणि योग्य काळजी घेणं अत्यावश्यक आहे.




