अजितदादांच्या मृत्यूचा गुन्हा दाखल करा, मगच माघारीचा विचार; काँग्रेसच्या भूमिकेला राऊतांचे समर्थन आणि विखे-पाटलांना टोला
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापले असून, आता यात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. “लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग काँग्रेसने उमेदवार दिला तर इतका दबाव का?” असा सवाल करत राऊत यांनी सत्ताधारी भाजप आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, “हे नेते काही स्वातंत्र्यसैनिक नाहीत की जे लोकांना लोकशाही समजावून सांगायला जातील. हे नेते हातात फाईल घेऊन जातात आणि निवडणूक न लढण्यासाठी धमक्या देतात. ‘निवडणूक लढवू नका, नाहीतर तुमच्या कारखान्याला नोटीस पाठवू’ असं सांगून दबाव निर्माण केला जातो. जे घाबरतात ते मागे हटतात, पण आम्हाला भाजपची गुलामी मान्य नाही.”
अजित पवार गटाने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावर राऊत यांनी जुना दाखला दिला. “लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाने निवडणूक लढवली नव्हती का? तेव्हा काँग्रेसच्या मदतीने ते रिंगणात होतेच ना? मग आताच बिनविरोधची अपेक्षा कशासाठी?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राऊत यांनी स्पष्ट केले की, शरद पवार यांनी कौटुंबिक भावना जपण्यासाठी आपला उमेदवार दिला नाही, ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र, काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष असून त्यांनी घेतलेली भूमिका ही लोकशाहीला धरून आहे. काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी टाकलेल्या अटीचे राऊत यांनी समर्थन केले. “अजित पवारांच्या संशयास्पद अपघाताचा गुन्हा (FIR) महाराष्ट्रात दाखल करा, तरच माघारीचा विचार करू, ही काँग्रेसची अट रास्त आहे,” असे राऊत म्हणाले.
“आम्ही भाजपच्या दहशतीला मुळीच घाबरत नाही. देशात लोकशाही आहे आणि ती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल. नाहीतर आयुष्यभर भाजपचे गुलाम म्हणून राहावे लागेल,” अशा कडक शब्दांत राऊत यांनी महाविकास आघाडीची ठाम भूमिका मांडली. बारामतीत जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) थेट रिंगणात नसले तरी, मित्रपक्ष म्हणून काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत राऊत यांनी दिले आहेत.




