अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीत राजकीय कलगीतुरा; पार्थ पवारांच्या ‘डाऊनफॉल’ टीकेला काँग्रेसचे सणसणीत प्रत्युत्तर
अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवरून आता राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. या निर्णयावर आमदार पार्थ पवार यांनी “हा काँग्रेसचा डाऊनफॉल (अध:पतन) आहे” अशी टीका केली होती. पार्थ पवारांच्या या विधानाने संतापलेल्या काँग्रेसने आता थेट शब्दांचे ‘बाण’ चालवत पार्थ पवारांवर अत्यंत विखारी टीका केली आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून पार्थ पवारांच्या वैयक्तिक आणि राजकीय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसने म्हटले की “ज्याला धड भाषणही देता येत नाही आणि जो केवळ कुटुंबाच्या पुण्याईवर खासदार झाला आहे, अशा मुलाने काँग्रेसच्या पडझडीबद्दल बोलणे हास्यास्पद आहे. स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर जमिनीच्या घोटाळ्यातील चौकशीतून वाचण्यासाठी सत्तेसमोर शरणागती पत्करणारा हा मुलगा ‘कृतघ्न’ आहे.”
काँग्रेसने या वादात अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा खोदून काढला आहे. “अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने तिथे FIR दाखल केला आहे. पण महाराष्ट्रात मात्र या प्रकरणावर मौन पाळले जात आहे,” असा दावा काँग्रेसने केला आहे. इतकेच नाही तर, बारामतीचे काँग्रेस उमेदवार ‘जर या संशयास्पद मृत्यूचा गुन्हा महाराष्ट्रात नोंदवला तर मी माघार घेण्यास तयार आहे’ अशी आव्हानात्मक भूमिका घेत असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयमी पण खोचक प्रतिक्रिया दिली आहे. पटोले म्हणाले की, “पार्थ पवार वयाने लहान आहेत, त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्यात वेळ घालवायचा नाही. कुणाचा डाऊनफॉल होणार हे वेळच ठरवेल.” तसेच सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन केल्याचे सांगत, दबावतंत्राचा वापर करून निवडणूक जिंकता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. एकंदरीत, बारामतीची ही पोटनिवडणूक आता केवळ मतांची राहिली नसून, ती वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप आणि संघर्षाची लढाई बनली आहे.




