धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे काळे साम्राज्य आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. १८ मार्च रोजी बेड्या ठोकल्यानंतर, काही दिवसांपूर्वीपर्यंत ताठ मानेने फिरणारा हा ढोंगी आता पोलिसांच्या कोठडीत अक्षरशः रडकुंडीला आला आहे. एसआयटी (SIT) मार्फत सुरू असलेल्या कसून चौकशीत खरातचे केवळ लैंगिक अत्याचारच नव्हे, तर अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणे आणि भाविकांची मोठी आर्थिक लुबाडणूक करणे असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ज्या हाताने तो लोकांचे ‘भविष्य’ सांगण्याचा दावा करायचा, तेच हात आता बेड्यांमध्ये जखडले गेले असून त्याचे स्वतःचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
कोठडीतील गेल्या १७-१८ दिवसांत खरातची प्रकृती कमालीची खालावली आहे. कधीकाळी अत्यंत विलासी जीवन जगणाऱ्या या भोंदूला आता साध्या कोठडीत राहणे असह्य झाले असून, तो पाच गंभीर व्याधींनी ग्रस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेच्या वेळी ७९ किलो वजनाचा असलेला खरात आता ६-७ किलोने रोडावला आहे. सततचा मानसिक तणाव आणि पोलिसांच्या चौकशीचा धाक यामुळे तो पूर्णपणे खंगून गेला आहे. जुन्या पॅरालिसिसच्या (पक्षाघात) झटक्यामुळे त्याच्या एका हाताची हालचालही मंदावली असून, औषधोपचारांचा मारा सुरू असतानाच त्याला पोलिसांच्या प्रश्नांचाही सामना करावा लागत आहे.
खरातच्या चौकशीतून समोर येणारी माहिती कोणत्याही क्राईम थ्रिलरपेक्षा भयानक आहे. महिलांवर अत्याचार केल्यानंतर त्यांचे व्हिडिओ शूट करणे आणि त्या जोरावर त्यांना वारंवार धमकावणे हा त्याचा क्रूर पॅटर्न होता. केवळ महिलाच नाही, तर त्याच्या दरबारात येणाऱ्या सामान्य भक्तांना फसवून त्याने लाखो रुपयांची माया जमवली होती. मात्र, आता नियतीने त्याचे चक्र फिरवले असून, स्वतःच्याच दुष्कृत्यांच्या ओझ्याखाली तो दबला गेला आहे. “पेराल तेच उगवते” या उक्तीप्रमाणे, इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या खरातची स्वतःची प्रकृती आणि प्रतिष्ठा आता धुळीला मिळाली आहे.




