Ashok Kharat Scam Case : खरात यांचे ६० कोटींचे संशयास्पद व्यवहार आणि १०० बँक खाती जप्त; ‘समता’ पतसंस्था रडारवर

spot_img

अध्यात्म आणि समाजसेवेच्या नावाखाली काळ्या पैशाचा खेळ; शिर्डी पोलिसांच्या तपासात धक्कादायक आर्थिक धागेदोरे उघड

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या गुन्ह्यांची व्याप्ती आता केवळ अत्याचारापुरती मर्यादित राहिली नसून, त्याचे मोठे ‘आर्थिक साम्राज्य’ समोर आले आहे. शिर्डी पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये खरातचे संशयास्पद हितसंबंध उघड झाले आहेत. पोलिसांनी खरातशी संबंधित तब्बल १०० बँक खाती गोठवली असून, २०२१ पासून या खात्यांमधून सुमारे ६० कोटी रुपयांची अवाढव्य उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व शंभर खात्यांवर एकाच व्यक्तीचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून लावण्यात आले असून, हे बँकिंग नियमांचे सरळसरळ उल्लंघन असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान असे समोर आले आहे की, पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काका कोयटे आणि अशोक खरात यांचे जवळचे संबंध होते. २०२१ मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या एका राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात या भोंदू बाबाला ‘प्रमुख पाहुणा’ म्हणून सन्मानित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, याच व्यासपीठावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचीही उपस्थिती होती. समाजातील उच्चपदस्थ व्यक्तींकडून मिळणाऱ्या या प्रतिष्ठेचा वापर करूनच खरातने आपले गुन्हेगारी जाळे विणल्याचा आरोप आता सर्वसामान्यांकडून केला जात आहे. नियमांना धाब्यावर बसवून एकाच व्यक्तीच्या नावावर इतकी खाती उघडण्यास पतसंस्थेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली, याची आता कसून चौकशी सुरू आहे.

या ६० कोटींच्या व्यवहारांमागे भक्तांनी दिलेल्या देणग्या आहेत की काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी या पतसंस्थेचा वापर केला गेला, याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे. केवायसी (KYC) नियमांच्या पायमल्लीमुळे समता पतसंस्थेच्या व्यवस्थापनावरही अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणामुळे शिर्डी आणि राहाता परिसरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या कारणास्तव पतसंस्थेच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खरातचे हे आर्थिक जाळे राज्याच्या इतर भागांतही पसरले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ