Pune Crime News : चांडोलीतील भोंदू बाबावर महिलांच्या शोषणाचे आरोप; आरोपी फरार

spot_img

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांडोली येथे अध्यात्माच्या आड महिलांचे शोषण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवदत्त आश्रमात ‘महाराज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवनाथ गवळी याच्यावर एका महिलेने राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ‘दोष निवारण’च्या नावाखाली गवळी याने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करत विनयभंग केला. सुरुवातीला भीतीमुळे हा प्रकार दडपून ठेवण्यात आला होता, पण नंतर धैर्य एकवटून तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभर अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या भोंदूगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, काही उच्चपदस्थ अधिकारी देखील अशा भोंदू बाबांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या माध्यमातून महिलांचे शोषण झाल्याची शक्यता आहे.

सरकारने अशा अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांची नावे जाहीर करावीत आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ