अध्यात्माच्या नावाखाली वासनेचा बाजार मांडणारा आणि गरिबांच्या जमिनी हडपणारा ‘भोंदूबाबा’ अशोक खरात याचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. ज्याच्या दारात एकेकाळी बड्या नेत्यांची आणि आमदारांची रांग लागायची, तोच खरात आज पोलिसांच्या कोठडीत आपल्या कर्माची फळं भोगत आहे. पण आता या प्रकरणात एक नवीन टर्न आलाय. खरातची पत्नी फरार झाली आहे, तर मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अशोक खरातच्या पापाच्या साम्राज्यात केवळ तोच नाही, तर त्याचे कुटुंबही सहभागी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे. जेव्हा SIT पथक खरातच्या घरी चौकशीसाठी पोहोचले, तेव्हा कल्पना खरात तिथून गायब होती. अखेर पोलिसांनी तिचा मुलगा हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेतले आहे. आई कुठे आहे? आणि या व्यवहारांमध्ये कोणाकोणाचे हात गुंतले आहेत? याची चौकशी आता पोलीस करत आहेत.
अशोक खरातची पत्नी कल्पनाचा जन्म एका अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबात झाला. लग्नापूर्वी तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. तिचे वडील सामान्य नोकरी किंवा मजुरी करून घर चालवत असत. एका छोट्याशा घरात राहणाऱ्या कल्पनाला लहानपणापासूनच गरिबीचे चटके सहन करावे लागले होते. पैशांच्या कमतरतेमुळे तिचं शिक्षणही हवं तसं पूर्ण होऊ शकलं नाही. घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना चैनीच्या गोष्टी तर दूरच होत्या. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ती नेहमीच कोणत्या तरी संधीच्या शोधात होती. अशातच तिची अशोक खरातशी ओळख झाली. खरातच्या बायकोचं खरं नाव कल्पना नाही, लग्नाआधीच नाव सुनीता असं होतं. खरातने काळे कारनामे सुरू करण्याआधी तिच्या नावात बदल करून तिला कल्पना म्हणून नवी ओळख दिली. लग्नानंतर तिचे माहेराशी संबंधही कमी झाले होते.
अशोक खरात हा सुरुवातीला एक सामान्य माणूस म्हणून लोकांच्या संपर्कात आला. त्याने जेव्हा स्वतःची ‘बाबा’ म्हणून प्रतिमा तयार करायला सुरुवात केली, तेव्हा त्याला एका खंबीर साथीदाराची गरज होती. कल्पनाच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे, खरातने तिला आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचे आणि मोठ्या स्वप्नांचे आमिष दाखवले असावे, असे बोलले जाते. तिच्या व खरातच्या वयातही मोठे अंतर असल्याची देखील चर्चा आहे. गरिबी माणसाला काय काय करायला लावते याचं जिवंत उदाहरण म्हणजे कल्पना. अशोक खरातच्या भपकेबाज आयुष्याला भुलून किंवा परिस्थितीचा विचार करून कल्पनाने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे लग्न केवळ दोन व्यक्तींचं नातं नव्हतं, तर एका मोठ्या ‘गेम’ची ती सुरुवात होती. आज जेव्हा अशोक खरातच्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला आहे, तेव्हा सुनीता उर्फ कल्पनाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, खरातने जमवलेल्या संपत्तीचे अनेक धागेदोरे तिच्यापर्यंत पोहोचतात. लग्नाआधी ज्या मुलीकडे साधी सायकल नव्हती, तिच्याकडे आज करोडोंची मालमत्ता कशी आली? हाच मोठा प्रश्न आहे.
अशोक खरातवर केवळ लैंगिक शोषणाचेच नाही, तर गंभीर आर्थिक फसवणुकीचेही आरोप आहेत. शिर्डी येथील 5 एकर जमिनीचा हा व्यवहार पाहून कोणाचाही थरकाप उडेल. जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या तक्रारीनुसार, खरातने त्यांना कर्ज देण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढले. अव्वाच्या सव्वा दराने व्याज लावून, कर्ज फेडता येत नाही हे पाहून त्यांची मौल्यवान जमीन हडपली. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली असून त्यांना राहाता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सावकारीच्या नावाखाली गरिबांना लुटण्याचे हे मोठे रॅकेट असल्याचे पोलिसांचे प्राथमिक मत आहे.
ज्या खरातचे अधिकृत वार्षिक उत्पन्न केवळ 12 लाख रुपये दाखवले जाते, त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आली कुठून? पुण्याच्या पॉश मॉडल कॉलनीतील ’24 रत्नम’ नावाच्या आलिशान सोसायटीत खरातच्या मुलीच्या नावावर एक 3 BHK फ्लॅट आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 2023 मध्ये हा फ्लॅट खरेदी करताना खरातने बिल्डरला तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये रोख दिले होते. कोणताही चेक नाही, कोणताही ऑनलाइन व्यवहार नाही. हा काळा पैसा नेमका कुठला? असा प्रश्न आता आयकर विभागाला पडला आहे.
खरातने आपल्या विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर GST बुडवल्याचा संशय आहे. आयकर विभाग आता खरातच्या CA ची आणि त्याची समोरासमोर चौकशी करणार आहे. शेकडो कोटींचे हे साम्राज्य केवळ अध्यात्मातून उभे राहिले की यामागे काही मोठे राजकीय वरदहस्त आहेत? हे लवकरच स्पष्ट होईल. या प्रकरणातील सर्वात स्फोटक माहिती म्हणजे खरातचे राजकीय संबंध. एका आमदाराने मोठा खुलासा केला आहे की, खरातच्या दारात तब्बल 39 आमदार रांगा लावून उभे असायचे. जर हे खरे असेल, तर या भोंदूबाबाचा राजकीय वावर किती मोठा होता याची कल्पना येते. या आमदारांपैकी कोणी त्याला पाठीशी घालत होते का? किंवा या बदल्यात खरातने काही राजकीय तडजोडी केल्या होत्या का? हा तपासाचा मोठा विषय बनला आहे.
अशोक खरातवर आतापर्यंत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप त्याच्यावर आहेत. त्याची पोलीस कोठडी आज संपली असून त्याला नाशिक जिल्हा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कारण, जसा जसा तपास पुढे जात आहे, तसे तसे खरातचे नवीन ‘कारनामे’ उघड होत आहेत. अध्यात्माच्या पदराखाली लपलेला हा सैतान आता उघडा पडला आहे. पण प्रश्न हा उरतो की, इतकी वर्षे हे सर्व सुरू असताना प्रशासन आणि समाज गप्प का होता? खरातची पत्नी अजूनही फरार आहे, तिला पोलीस कधी पकडणार? आणि या 39 आमदारांची नावे समोर येणार का?




