इराण–इस्त्रायल–अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद राहण्याची वेळ आली आहे, रिक्षा चालकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे, तर पेट्रोल-डिझेल आणि गॅससाठी लोकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.
या गंभीर परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, सामान्य नागरिक अक्षरशः हवालदिल झाला असून छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाचालक थेट मंत्र्यांच्या दारात जाऊन आपली व्यथा मांडत आहेत. हॉटेल्समध्ये जेवणाची सोय बिघडली आहे, तर विद्यार्थ्यांनाही कॉलेज कॅन्टिनमध्ये नीट अन्न मिळत नाही, अशी स्थिती त्यांनी मांडली. मंत्रिमंडळातील मंत्री एकमेकांना गॅस सिलिंडरच्या प्रश्नावर पत्रव्यवहार करत असल्याचे सांगत त्यांनी ही परिस्थिती ‘गंभीर संकट’ असल्याचे वर्णन केले.
सुळे पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने या परिस्थितीबाबत स्पष्ट आणि प्रामाणिक माहिती जनतेसमोर मांडावी. देशावर संकट आले असल्यास सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करण्याची तयारी आहे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, त्यासाठी सरकारने अडचणींची पारदर्शक कबुली देणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.




