युसुफ हाईट्समध्ये मध्यरात्री कारवाई; सुरा, गुप्ती अन् चाकूंचा साठा जप्त, गुन्हेगारी जगाशी कनेक्शन असल्याचा संशय
कल्याणमधील गजबजलेल्या घास बाजार परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका १९ वर्षांच्या तरुणाच्या कारनाम्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरवर पाहता मोबाईल रिपेरिंगचा साधा व्यवसाय करणारा युवेश हनिफ सय्यद प्रत्यक्षात घरात शस्त्रांचा मोठा साठा बाळगून होता. ‘युसुफ हाईट्स’ इमारतीमधील त्याच्या घरावर बाजारपेठ पोलिसांनी मध्यरात्री ११ च्या सुमारास अचानक छापा टाकला आणि तिथले दृश्य पाहून पोलीसही अवाक झाले. या कारवाईत पोलिसांनी बेकायदेशीर सुरा, मुठीची गुप्ती आणि धारदार लोखंडी चाकू असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी मोहीम फत्ते केली. पोलिसांच्या चौकशीत युवेशने आपला गुन्हा कबूल केला असून, प्रतिबंधित शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अवघ्या १९ वर्षांच्या या तरुणाकडे इतका मोठा शस्त्रसाठा आला कुठून आणि त्याचा वापर नक्की कशासाठी केला जाणार होता? यामागे एखादी मोठी टोळी सक्रिय आहे का? या प्रश्नांनी पोलिसांची झोप उडवली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.




