ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सलीम साजिद पठाण (वय २०, रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांनी या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिल्या होत्या.त्या अनुषंगाने २९ तारखेला गुन्हे शाखेचे पथक नारायणगाव परिसरात गस्त घालत असताना, सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी सुझुकी कंपनीच्या एस्टीम (MH 12 DE 2767) या कारमधून तलवारी घेऊन येणार असल्याची माहिती होती.
पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयित वाहन थांबवले. पंचांच्या उपस्थितीत गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये १० मोठ्या व २ लहान अशा एकूण १२ तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी तलवारींसह वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील करत आहेत.
सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सपांगे, पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेव पाटील,सहा.फौज.दीपक साबळे,पोलीस हवालदार संदीप वारे,पोलीस हवालदार राजू मोमिन,पोलीस शिपाई अक्षय नवले, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.




