एअर स्ट्राईकनंतर तालिबानची प्रत्युत्तर कारवाई; दोन्ही देशांमध्ये सलग 48 तासांपासून जोरदार गोळीबार
पाकिस्तानने दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचा दावा करत अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव तीव्र झाला आहे. या हल्ल्यांमध्ये अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याच्या निषेधार्थ तालिबान सरकारने पाकिस्तानविरुद्ध प्रतिहल्ले सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सीमारेषेवर मागील 48 तासांपासून जोरदार गोळीबार सुरू असल्याचे वृत्त आहे.
अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अफगाण सैन्याने पाकिस्तानमधील लष्करी ठिकाणे आणि महत्त्वाच्या केंद्रांवर कारवाई सुरू केली आहे. अफगाण सैन्याने मल्टी बॅरल रॉकेट लाँचरसह विविध जड शस्त्रांचा वापर केल्याचेही सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंगरहार–खैबर आणि कुनार–बाजौर सीमाभागात रात्री साडेनऊच्या सुमारास मोठा हल्ला चढवण्यात आला. या कारवाईत टँक, तोफखाना, रॉकेट आणि मोर्टारचा वापर करण्यात आला. तालिबान सरकारने पाकिस्तानच्या 15 लष्करी ठिकाणांवर ताबा मिळवल्याचा तसेच पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
नंगरहार सीमेवरील दोन, गोश्ता सीमेवरील तीन आणि कुनार सीमेवरील दोन ठिकाणी अफगाण सैन्य तैनात असल्याचे सांगितले जाते. ‘ऑपरेशन 201 खालिद बिन वलीद ब्रिगेड’ आणि ‘205 अल बद्र ब्रिगेड’ या मोहिमांअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे तालिबानकडून जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, 22 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतातील खोग्यानी आणि गनी खेल तसेच पक्तिका प्रांतातील बेरमल आणि अर्गुन जिल्ह्यांमध्ये एअर स्ट्राईक केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यांत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तानच्या या कारवाईवर तालिबान सरकारने तीव्र आक्षेप नोंदवला होता.




