भारतीय पारंपरिक पेहरावात स्वागत; भारत–इस्रायल मैत्रीला वैयक्तिक स्पर्श.
नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यात भारत–इस्रायल संबंधांची अनोखी झलक पाहायला मिळाली. बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भारतीय पारंपरिक शैलीतील ‘मोदी जॅकेट’ परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. या खास gesture मुळे दोन्ही देशांतील मैत्री अधिक दृढ असल्याचा संदेश जगभर पोहोचला.
बुधवारी रात्री आयोजित विशेष मेजवानीत नेतन्याहू यांनी भारतीय पोशाखात हजेरी लावत मोदींना आश्चर्याचा धक्का दिला. मित्राच्या सन्मानार्थ केलेला हा पेहराव केवळ औपचारिक नव्हता, तर दोन्ही नेत्यांतील जवळीक दर्शवणारा होता.
दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आणखी एक हलकाफुलका प्रसंग घडला. मोदींचे विमान उतरल्यानंतर नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. सारा यांनी भगव्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला होता. त्यावर नेतन्याहू यांनी मोदींच्या जॅकेटवरीील पॉकेट स्क्वेअरकडे पाहत रंग जुळल्याची मिश्किल टिप्पणी केली. या क्षणावर दोन्ही नेत्यांनी मनमोकळेपणाने हास्याची देवाणघेवाण केली.
नेतन्याहू यांनी या भेटीचा व्हिडिओ आपल्या ‘X’ खात्यावर शेअर करत, “संयुक्त भोजनापूर्वी माझ्या मित्राला पारंपरिक भारतीय पोशाखात सरप्राईज दिले,” असे नमूद केले. गळाभेट आणि अनौपचारिक संवादातून दोन्ही देशांतील मैत्रीचा जिव्हाळा पुन्हा अधोरेखित झाला.




