इंद्रावती परिसरात मोठी कारवाई; माओवादी प्रमुख देवजीने तेलंगणात आत्मसमर्पण केल्याची माहिती.
छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेवरील नक्षलप्रवण भागात सुरक्षा दलांकडून माओवाद्यांविरोधात सातत्याने मोहीमा राबवल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बिजापूर जिल्हा येथे पुन्हा एकदा पोलिस आणि माओवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या कारवाईत दोन माओवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती नदी पात्र परिसरात आज सकाळपासून मोठे ऑपरेशन सुरू होते. दरम्यान, सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात गोळीबार झाला. घटनास्थळी दोन माओवाद्यांचे मृतदेह सापडले असून एसएलआरसारखी अत्याधुनिक बंदूक आणि इतर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार माओवादी संघटनेचे प्रमुख देवजी उर्फ टिपिरी तिरुपती आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजू रेड्डी यांनी १६ सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची चर्चा आहे. पुढील दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवजीची निवड बसवराजू यांच्यानंतर संघटनेच्या प्रमुखपदी झाली होती.
गडचिरोली जिल्ह्यात १९९१ साली आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे अपहरण देवजीच्या नेतृत्वाखालील माओवाद्यांनी केल्याची नोंद आहे. त्यामुळे देवजीच्या आत्मसमर्पणाच्या वृत्तामुळे सुरक्षा यंत्रणांसाठी ही मोठी घडामोड मानली जात आहे.




