Virat Kohli : किंग कोहलीची रेस्टॉरंटमधून अधिकृत एक्झिट

spot_img

थकीत देणी आणि वारंवार होणाऱ्या वादांमुळे अखेर ‘ब्रँड नेम’ काढून घेण्याचा मोठा निर्णय

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या नावाशी जोडलं गेलेलं बंगळुरूमधील प्रसिद्ध रेस्टॉरंट ‘वन८ कम्युन’ (One8 Commune) आता कायदेशीर कचाट्यात सापडलं आहे. बंगळुरू दिवाणी न्यायालयाने हे रेस्टॉरंट तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे रेस्टॉरंट चालवणाऱ्या ‘ट्रायो हिल्स हॉस्पिटॅलिटी’ या कंपनीने गेल्या सहा महिन्यांपासून इमारतीचं भाडं भरलेलं नाही. थकबाकीचा हा आकडा आता २ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असून, देखभाल शुल्क आणि महसुलातील हिस्साही अद्याप थकीत आहे. इमारतीच्या मालकाने वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि कोर्टाने या व्यवसायाला टाळं ठोकण्याचा कठोर निर्णय दिला.

या संपूर्ण प्रकरणाने विराट कोहलीच्या ब्रँड मूल्याला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने विराटने तातडीने कठोर पाऊल उचललं आहे. एकेकाळी या रेस्टॉरंटचा प्रमुख चेहरा असलेल्या विराटने आता ‘वन८ कम्युन’शी असलेले आपले सर्व संबंध अधिकृतपणे तोडले आहेत. विराटने केवळ आपला गुंतवणुकीचा हिस्साच काढून घेतलेला नाही, तर आपले प्रसिद्ध ‘वन८’ हे ब्रँड नेम देखील या रेस्टॉरंटवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. रेस्टॉरंटच्या ढासळत्या व्यवस्थापनामुळे आणि थकीत कर्जाच्या डोंगरामुळे विराटला आपले नाव वाचवण्यासाठी हा मोठा निर्णय घ्यावा लागला असल्याचे बोलले जात आहे.

‘वन८ कम्युन’ वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि पालिका प्रशासनाच्या नोटिसांमुळे हे हॉटेल चर्चेत आले होते. ग्राहकांची कमी होणारी संख्या आणि वाढता तोटा यामुळे हे रेस्टॉरंट डबघाईला आले होते. आता जोपर्यंत २ कोटी रुपयांचे थकीत कर्ज आणि इतर देणी पूर्ण केली जात नाहीत, तोपर्यंत हे रेस्टॉरंट बंदच राहणार आहे. विराट कोहलीसारख्या मोठ्या नावाचा आधार असूनही, केवळ व्यावसायिक ढिलाईमुळे एका आलिशान रेस्टॉरंटवर ही नामुष्की ओढवल्याने उद्योजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ