Vijay Vadettiwar on OBC Census : ‘जितकी संख्या भारी, तितकी भागीदारी’ म्हणत काँग्रेस नेत्याचा केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा

spot_img

देशात राष्ट्रीय जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी त्यात इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) स्वतंत्र रकाना नसल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यास मोदी सरकार नेमके कशाला घाबरत आहे, असा थेट सवाल करत त्यांनी सरकारवर बेईमानी आणि विश्वासघाताचा आरोप केला आहे. ओबीसींची नेमकी लोकसंख्या समोर आल्यास त्यांच्या हक्काचा वाटा आणि सवलती द्याव्या लागतील, याच भीतीने सरकार पावले मागे घेत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. या अन्यायाविरोधात पूर्व विदर्भात लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या लढ्याची पहिली ठिणगी भंडारा जिल्ह्यात पडली असून, तिथे ओबीसी बांधवांनी जनगणनेवर बहिष्कार टाकल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. देशाच्या अर्थसंकल्पापासून ते शैक्षणिक शिष्यवृत्तीपर्यंत सर्वच क्षेत्रांत ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्काचा वाटा मिळाला पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, जनगणनेत सहकार्य न केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या शासकीय धमक्यांना आपण अजिबात घाबरत नसल्याचे सांगत, “सरकारने गुन्हे दाखल करून दाखवावेत, आम्ही सर्व ओबीसी मिळून ‘जेलभरो’ आंदोलन करू,” असे आव्हानच त्यांनी प्रशासनाला दिले आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळावर टीका करताना, देशात सर्व सोयीसुविधा असूनही आज सर्वसामान्य जनता संकटात सापडली असून सरकारने देशाचे ‘बारा’ वाजवले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ