तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडवत अभिनेता विजय यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवत सत्तेवर कब्जा केला आहे. निवडणुकीपूर्वी जनतेसमोर मांडलेल्या आश्वासनांवर मतदारांनी विश्वास दाखवत विजय यांच्या नेतृत्वाला स्पष्ट कौल दिला. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच विजय यांनी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नवीन सरकारने धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानकांच्या ५०० मीटर परिसरातील दारू दुकाने बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार राज्यातील तब्बल ७१७ सरकारी ‘तासमॅक’ दारू दुकाने बंद करण्यात येणार असून, पुढील दोन आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तामिळनाडूमध्ये सरकारी नियंत्रणाखाली चालणाऱ्या दारू विक्री केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असला, तरी सामाजिक हिताला प्राधान्य देत सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालये, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणांच्या आसपास असलेल्या दारू दुकानांविरोधात नागरिक आणि विविध संघटनांकडून आंदोलन केले जात होते. विशेषतः युवकांवर होणारा परिणाम आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन अशा दुकानांवर निर्बंध आणण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर विजय सरकारने कठोर पाऊल उचलल्याने अनेक स्तरांतून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
तामिळनाडूपुरता मर्यादित नसलेला हा विषय आता राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा ठरत आहे. महसुलावर परिणाम होण्याची शक्यता असतानाही सामाजिक जबाबदारीला महत्त्व देत घेतलेल्या या निर्णयामुळे विजय यांच्या नेतृत्वशैलीची देशभर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काळात इतर राज्येही अशा प्रकारचे निर्णय घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




