AIADMK मध्ये ऐतिहासिक बंड: एडप्पादी पलानीस्वामींना मोठा धक्का, विजय यांच्या सत्तेचा मार्ग झाला अधिक सुकर; DMK सोबतच्या छुप्या युतीचा आरोप करत आमदारांनी सोडली साथ
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या ‘थलपती’ विजय यांच्या नावाची त्सुनामी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर अवघ्या काही दिवसांतच विजय यांनी आपली राजकीय पकड मजबूत केली असून, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी विजय यांना सुरुवातीला मोठी कसरत करावी लागली होती, परंतु आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या AIADMK मध्ये मोठी फूट पडल्याने विजय यांचे सरकार अधिक शक्तिशाली झाले आहे. ज्येष्ठ नेते सी.व्ही. शनमुगम यांच्या नेतृत्वाखाली ३० आमदारांनी विजय यांच्या TVK पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर AMMK चे आमदार कामराज यांनीही विजय यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे बुधवारी होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वीच विजय यांनी मैदान मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार, विजय यांच्या स्वतःच्या पक्षाकडे १०७ जागा असून काँग्रेस, डावे पक्ष, वीसीके आणि मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर त्यांनी सत्ता स्थापन केली होती. आता ३० नवीन आमदारांच्या आगमनामुळे विजय यांच्या सरकारला कोणाचीही भीती उरलेली नाही. या फुटीमुळे एडप्पादी के. पलानीस्वामी (EPS) यांच्याकडे आता केवळ १७ आमदार उरले आहेत. शनमुगम यांनी पलानीस्वामींवर गंभीर आरोप करत म्हटले की, पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते. “AIADMK ची स्थापनाच मुळी DMK सारख्या शक्तींना रोखण्यासाठी झाली होती, मात्र EPS गट त्यांच्याशीच हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत होता, जे कार्यकर्त्यांना मान्य नव्हते,” असे शनमुगम यांनी स्पष्ट केले. या राजकीय भूकंपामुळे तामिळनाडूमध्ये आता थलपती विजय यांचे ‘एकहाती’ वर्चस्व निर्माण झाले असून, विरोधी गोटात मात्र शांतता पसरली आहे.




