“लग्नानंतरही पत्नीचे होते अनैतिक संबंध”; पीडित तरुणाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये
अंबाजोगाई शहराच्या मोरेवाडी परिसरात नुकतीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली होती, जिथे विवाह होऊन अवघे १२ दिवस झाले असताना एका नवविवाहित तलाठी तरुणाने गळफास लावून आपले आयुष्य संपवले होते. आता या आत्महत्येला एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. मृत तरुण गणेश कोळी याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अखेर त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीचे लग्नाबाहेरील अनैतिक संबंध आणि त्यामुळे मुलाला सहन करावा लागलेला तीव्र मानसिक त्रास, याच छळाला कंटाळून गणेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा थेट आरोप त्याच्या आईने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत गणेश दत्तू कोळी (वय वर्ष २०२४ च्या बॅचचे तलाठी) यांचा विवाह १३ मे रोजी बीड येथील एका तरुणीशी मोठ्या थाटामाटात झाला होता. गणेशची पत्नी अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करते. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपे जेव्हा कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले, तेव्हापासूनच गणेशला आपल्या पत्नीच्या वागण्याचा संशय येऊ लागला होता. ती सतत कोणाशी तरी लपून फोनवर बोलायची. घरी सत्यनारायणाची पूजा झाली, तरी तिच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. उलट, तिने “हे लग्न माझ्या मर्जीविरुद्ध झाले आहे” असे सांगत गणेशसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली.
२४ मे रोजी गणेश आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आणि समजूत काढण्यासाठी अंबाजोगाईच्या मोरेवाडी येथील तिच्या खोलीवर आला होता. मात्र, तिथे गेल्यावर एका डायरीने सर्व काही उद्ध्वस्त केले. २५ मे रोजी गणेशने आपल्या बहिणीला फोन केला. तो फोनवर ढसाढसा रडत होता. त्याने बहिणीला सांगितले की, “माझ्या पत्नीचे दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. तिने स्वतःच्या डायरीत या प्रेमसंबंधांबद्दल लिहून ठेवले आहे, जे मी आज स्वतः वाचले आहे.” या डायरीतील मजकुरावरून त्या दोघांमध्ये खोलीत प्रचंड वाद झाला. या वादाच्या मानसिक धक्क्यातून आणि नैराश्यातून काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या त्याच खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. गणेश हा मूळचा अत्यंत कष्टाळू तरुण होता. २०२१ मध्ये तो राज्य राखीव पोलीस बलात (SRPF) पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. पोलीस दलात सेवा बजावत असतानाच त्याने जिद्दीने अभ्यास केला आणि २०२४ मध्ये तो चंद्रपूर येथे तलाठी म्हणून रुजू झाला होता.
कष्टाने मिळवलेली नोकरी आणि नुकतेच सुरू झालेले वैवाहिक आयुष्य एका क्षणात संपल्याने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर आई सुनंदा दत्तू कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, त्या डायरीचा आणि पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




