बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सांगता सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण आणि भावनिक विधान केलं. आपल्या भाषणात त्यांनी सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आपली इच्छा होती, याची आठवण करून दिली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच आपण माध्यमांमध्ये ही भूमिका मांडली होती, असंही त्यांनी सांगितलं. मात्र काही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यामुळे आता मतदान अपरिहार्य ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सभेत बोलताना सुळे यांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला. बारामतीकरांनी लोकशाही प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. याच वेळी त्यांनी मतदारांना थेट साद घालत, सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. मतदान यंत्रावर पहिल्या क्रमांकावर असलेल्या बटनावर क्लिक करून त्यांना विजयी करावं, असं त्या म्हणाल्या.
तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत त्यांनी भावनिक सूर लावला. त्यांच्या कार्याचा आदर राखत आणि त्यांच्या कुटुंबीयांना साथ देण्याच्या भावनेतून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहावं, असं त्यांनी सांगितलं. या विधानामुळे सभेला उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.
या वक्तव्यांमुळे बारामतीतील राजकीय वातावरण आणखी तापलं असून, पोटनिवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आगामी मतदानात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.




