वाढत्या उन्हाच्या झळांपासून स्वतःचा बचाव करतानाच जर तुम्हाला स्टायलिश दिसायचे असेल, तर ‘स्टोल’ हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. केवळ एक कापडाचा तुकडा नसून, स्टोल हे आजच्या फॅशन विश्वातील एक महत्त्वाचे अक्सेसरी बनले आहे. स्कार्फपेक्षा लांब आणि ओढणीपेक्षा आटोपशीर असलेला हा प्रकार महिला आणि पुरुष दोघांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे. उन्हाळ्यात त्वचेचे रक्षण करण्यासोबतच तुमच्या साध्या पेहरावाला एक ‘क्लासी’ लूक देण्याचे काम स्टोल करतो.
स्टोल स्टाईल करण्याच्या ५ भन्नाट पद्धती
तुमच्या रोजच्या वापरातील कपड्यांना स्टोलच्या मदतीने तुम्ही एक नवीन ओळख देऊ शकता. त्यासाठी खालील काही स्टाईल्स नक्की वापरून पहा:
- बेल्टेड लूक: स्टोल गळ्याभोवती लांब सोडून कंबरेला एखादा ट्रेंडी बेल्ट लावा. हा लूक इंडो-वेस्टर्न कपड्यांवर अत्यंत उठावदार दिसतो.
- प्रोफेशनल ड्रेप: ऑफिस किंवा औपचारिक मीटिंगसाठी स्टोल खांद्यावर सरळ सोडा. यामुळे तुम्हाला एक शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासाने भरलेला लूक मिळेल.
- चोकर स्टाईल: जर तुम्हाला जीन्स आणि टी-शर्टवर स्टाईल करायची असेल, तर स्टोल गळ्याभोवती एकदा-दोनदा गुंडाळून त्याची टोके आतल्या बाजूला लपवा.
- गाठ मारण्याची पद्धत (Side Knot): कॅज्युअल कुर्ती किंवा टॉपवर स्टोल मानेभोवती टाकून एका बाजूला हलकी गाठ मारा. हा लूक कॉलेज किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाताना कूल दिसतो.
- प्रोटेक्शन विथ स्टाईल: उन्हात बाहेर पडताना स्टोल डोक्यावरून घेऊन गळ्याभोवती गुंडाळल्यास चेहरा आणि केसांचे रक्षण होते आणि तुम्ही ‘फॅशनेबल’ही दिसता.
लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी :
१. पुरुषांसाठी पर्याय: स्टोल केवळ महिलांपुरते मर्यादित नसून, पुरुष देखील गडद किंवा मातीच्या रंगाचे (Earthy tones) स्टोल्स फॉर्मल शर्ट किंवा कुर्त्यावर वापरून आपली स्टाईल स्टेटमेंट तयार करू शकतात.
२. रंगांची निवड: जर तुमचा पोषाख साध्या (Plain) रंगाचा असेल, तर त्यावर नक्षीकाम केलेला किंवा प्रिंटेड स्टोल वापरावा. यामुळे कपड्यांचा लूक अधिक खुलून दिसतो.
३. फिनिशिंग: स्टोल वारंवार निसटू नये आणि तो व्यवस्थित टिकावा यासाठी बारीक सेफ्टी पिनचा वापर करणे केव्हाही सोयीचे ठरते.




