महाराष्ट्र सध्या एका विचित्र राजकीय प्रयोगातून जात आहे. ज्याला आपण ‘लोकशाही’ म्हणतो, तिथे ‘सत्ताधारी’ आणि ‘विरोधक’ अशा दोन बाजू असतात. पण बारामतीमध्ये आज जे घडतंय, ते पाहून प्रश्न पडतोय की, महाराष्ट्रात खरोखरच कोणी ‘विरोधक’ उरला आहे का? अजितदादा पवारांच्या (Ajit Pawar) निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक… सुनेत्राताई पवार (Sunetra Pawar) यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी महायुतीचे प्रयत्न… अचानक शरद पवारांनी (Sharad Pawar) निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय! इथपर्यंत सर्व ठीक होतं, याला ‘कौटुंबिक आदर’ म्हणता आलं असतं. पण जेव्हा महाविकास आघाडीचे आमदार, जे कालपर्यंत अजितदादांच्या अपघाताच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत होते, तेच रोहित पवार आज सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना दिसतात. हा कौटुंबिक प्रश्न आहे की मतदारांशी केलेली गद्दारी? महाराष्ट्रातला विरोधी पक्ष इतका ‘नेभळट’ कसा? जो दिवसा विरोधाच्या गप्पा मारतो आणि रात्री सत्ताधाऱ्यांसोबत ‘पंगत’ बसवतो!
अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. पण राजकारण कधीच थांबत नसतं. बारामती पोटनिवडणूक जाहीर झाली. महायुतीने सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. शरद पवारांनी जाहीर केलं की आम्ही उमेदवार देणार नाही. काँग्रेसने सुरुवातीला शड्डू ठोकला, एड.आकाश मोरेंचं नाव चर्चेत आलं, पण दिल्लीतून फोन फिरले आणि काँग्रेसनेही माघार घेतली. प्रश्न असा आहे की, बारामतीमध्ये काय फक्त ‘पवार’ कुटुंबच राहतं? तिथल्या सामान्य मतदाराला दुसरा पर्याय मिळण्याचा अधिकार नाही का? लोकशाहीमध्ये निवडणुका या विचारांच्या लढाया असतात. जर तुम्ही निवडणूकच लढवणार नसाल, तर तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तुमचं अस्तित्व मान्य करताय का? आणि जर काँग्रेसला माघारच घ्यायची होती, तर मग उमेदवार दिलाच का? तुम्ही जर दिल्लीचेच आदेश मानणार होता, तर मग उमेदवार देण्याआधी ही चर्चा का केली नाही?
हे तेच रोहित पवार (Rohit Pawar) आहेत जे काही महिन्यांपूर्वी अजितदादांच्या ‘घातपाताचा’ संशय व्यक्त करत होते. पोलीस स्टेशनला एका साध्या FIR साठी वणवण फिरणारे रोहित पवार, आज त्याच अजितदादांच्या पत्नीचा पर्यायाने सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. ज्या महायुतीच्या विरोधात तुम्ही राज्यभर रान उठवलं, ज्या भाजप-शिंदे-अजितदादा गटाला तुम्ही ‘लोकशाहीचे मारेकरी’ म्हणता, 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत सुनेत्रा पवार व अजित पवारांच्या विरोधात प्रचार केला, आज त्यांच्याच उमेदवाराला मतं द्या असं सांगताना तुमची नैतिकता कुठे जाते? हा केवळ भंपकपणा नाही, तर हा मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे.
पवारांचा हा नेभळटपणा आजचा नाही. जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) संसदेत आणि रस्त्यावर गौतम अडाणींच्या विरोधात आवाज उठवत होते. ‘हम दो हमारे दो’ चा नारा देत होते. तेव्हा संपूर्ण पवार कुटुंब अडाणींच्या समर्थनात उभे होते. इतकंच कशाला, रोहित पवारांनी तर स्वतः गौतम अडाणींचे सारथ्य केलं होतं. त्यांची गाडी चालवली होती. एकीकडे तुमचा मित्रपक्ष काँग्रेस ज्या भांडवलशाहीच्या विरोधात लढतोय, त्याच भांडवलदाराची तुम्ही गाडी चालवता. मग प्रश्न पडतो की, तुमची विचारधारा नक्की आहे तरी काय?
महाराष्ट्राचा विरोधी पक्ष आज इतका हतबल आणि लाचार का वाटतोय? त्याची कारणं काय आहेत? ईडी आणि CBI ची भीती? की आपल्या फाईल्स दाबण्यासाठी ही ‘ऍडजस्टमेंट’ आहे? राजकारण गेलं चुलीत, आधी घर वाचवूया ही वृत्ती? जनतेला दाखवण्यासाठी भांडायचं आणि आतून हातमिळवणी करायची? जर विरोधकच सत्ताधाऱ्यांचा प्रचार करणार असतील, तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? आज बारामतीमध्ये जे होतंय, ते उद्या संपूर्ण महाराष्ट्रात झालं तर नवल वाटायला नको. ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो’ – हेच आजच्या विरोधी पक्षाचं ब्रीदवाक्य झालंय का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
शरद पवार हे राजकारणातले जादूगार मानले जातात. पण हे कोणतं नवं राजकारण आहे? स्वतःच्या पक्षाची जागा सोडून देणं. मित्रपक्षाला अर्थात काँग्रेसला उमेदवारी मागे घ्यायला लावणं. आणि आपल्या नातवाला सत्ताधाऱ्यांच्या प्रचारात उतरवणं. हे राजकारण जनतेच्या हिताचं आहे की पवार साम्राज्याच्या सुरक्षिततेचं? आज राज्यात बेरोजगारी आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याऐवजी, विरोधी पक्ष त्यांच्या प्रचाराच्या पालख्या वाहत आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
सामान्य मतदार हा वेडा नाही. तो सर्व उघड्या डोळ्यांनी बघतोय. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता, तेव्हा लोक विचारतात – ‘ज्यांच्या विरोधात आम्ही मतदान केलं, त्यांच्याच प्रचारासाठी तुम्ही कसे उतरलात?’ काय 2029 च्या लोकसभा व विदानसभा निवडणूकीत शरद पवार बारामतीमधून उमेदवार देणार नाहीत? रोहित पवार आणि शरद पवारांनी हे लक्षात ठेवायला हवं की, ही ‘ऍडजस्टमेंट’ तुम्हाला आज वाचवेल, पण उद्या जनतेच्या न्यायालयात तुम्हाला उभं राहावंच लागेल. विरोधी पक्ष म्हणून तुमची जबाबदारी सत्तेला प्रश्न विचारण्याची असते, त्यांच्या सतरंज्या उचलण्याची नाही. इतर कोणाही पेक्षा शरद पवारांना राजकारण जरा जास्त कळतं, त्यांनी याचा नक्कीच विचार केला असेल.
बारामतीची ही पोटनिवडणूक फक्त एका जागेची निवडणूक नाहीये. ही महाराष्ट्राच्या राजकीय नैतिकतेची परीक्षा आहे. विरोधी पक्ष जर असाच ‘नेभळट’ राहिला, तर या राज्यात लोकशाही नावापुरतीच उरेल. रोहित पवारांचा हा ‘प्रचार’ म्हणजे लोकशाहीचा, तिथल्या मतदारांचा अपमान आहे की कौटुंबिक प्रेम? यावर आता चहुबाजूंनी चर्चा सुरू झालीय. राज्यातला विरोधी पक्ष इतका नेभळट झालाय की तो कोणत्याही मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत नाही. उलट सत्ताधारीच विरोधकांना नॉन इश्यूवरून घेरत आहेत. मग तो मुद्दा औरंगजेबाच्या कबरीचा असो, हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीपू सुल्तानवरील विधानाचा असो की अन्य काही. विरोधक मात्र माध्यमांसमोर बाईट देण्यातच धन्यता मानताना दिसतोय.




