Suryakumar Yadav : टी-२० चा ‘नंबर १’ बॅटरच आता टीम इंडियावर ओझं?

spot_img

सूर्याच्या बॅटमधील धावा आटल्याने निवड समितीसमोर मोठे आव्हान

टीम इंडियाने जरी दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला असला, तरी संघाचा एकेकाळचा हुकूमी एक्का सूर्यकुमार यादव आता चिंतेचा विषय बनला आहे. आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये दीर्घकाळ अव्वल स्थानी राहिलेला सूर्या मैदानात उतरला की धावांचा पाऊस पडणार, हा विश्वास आता फिका पडू लागला आहे. नुकत्याच झालेल्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला, ज्यामुळे त्याच्या फॉर्मावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून सूर्याला धावा बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असून, केवळ न्यूझीलंडविरुद्धची मालिका सोडली तर त्याची बॅट बहुतांश वेळ शांतच राहिली आहे.

टी-२० वर्ल्ड कप २०२४ मधील विजयानंतर सूर्यकुमारकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात आले, परंतु कर्णधारपदाच्या ओझ्याखाली त्याच्या वैयक्तिक कामगिरीचा आलेख घसरल्याचे दिसत आहे. चालू आयपीएल हंगामात तर सूर्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गेल्या पाच सामन्यांमधील १६, ५१, ६, ३३ आणि ० अशी त्याची आकडेवारी सूर्याची जादू ओसरत असल्याची साक्ष देत आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या सूर्याकडून ३६ चेंडूत ५१ धावा ही अत्यंत संथ खेळी मानली जात होती, तीच खेळी आता त्याची ‘सर्वोत्तम’ कामगिरी ठरत आहे. ३५ वर्षांच्या सूर्याने जरी २०२८ च्या विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी सद्यस्थिती पाहता त्यांचे आंतरराष्ट्रीय करिअर धोक्यात असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, सूर्याची जागा घेण्यासाठी युवा खेळाडूंची मोठी फळी तयार आहे. श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार यांनी आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने आणि नेतृत्वगुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रेयस अय्यर सातत्याने चांगली कामगिरी करूनही त्याला टी-२० संघात स्थान मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता निवड समितीसमोर मोठा पेच आहे; अनुभवाच्या जोरावर सूर्याला संधी देत राहायचे की भविष्याचा विचार करून अय्यर किंवा पाटीदार यांसारख्या आक्रमक पर्यायांना प्राधान्य द्यायचे? जर सूर्याचा हा खराब फॉर्म असाच सुरू राहिला, तर भारतीय संघात मोठे बदल अटळ आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ