धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या प्रकरणाला ‘दहशतवादा’चे वळण; आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची भाजपची मागणी
नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनी टीसीएस (TCS) मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतर प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास आता दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला असून, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार एचआर मॅनेजर निदा खान ही सध्या भिवंडीत लपल्याची माहिती समोर येत असून, तिचे थेट संबंध दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी डॉ. शहीनशी असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे हे प्रकरण आता केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे न राहता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनले आहे.
नाशिकमध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे ‘टेरर कनेक्शन’ यंत्रणांची झोप उडवणारे ठरत आहे. तपास यंत्रणा निदा खानच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) आणि आंतरराष्ट्रीय संपर्कांचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुणींना जाळ्यात ओढणे, त्यांच्यावर नमाज पठणाची सक्ती करणे आणि मांसाहार करण्यासाठी दबाव टाकणे असे प्रकार पद्धतशीरपणे सुरू होते. या ‘कॉर्पोरेट जिहाद’ची केंद्रीय तपास यंत्रणांनीही गंभीर दखल घेतली आहे.
या गंभीर परिस्थितीवर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडत संताप व्यक्त केला आहे. “हिंदू मुलींचे धर्मांतर करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे. आरोपींचे राष्ट्रीयत्व रद्द करण्याची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना धडा शिकवण्याची मागणी करत भाजपने आज भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




