२०२१ च्या सत्य घटनेवर आधारित थरार; नेटफ्लिक्सवर विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेला हा चित्रपट नक्कीच ‘मस्ट वॉच’
जर तुम्ही ओटीटीवर काहीतरी अंगावर शहारे आणणारे शोधत असाल, तर ‘स्टीफन’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट २०२१ मध्ये केरळमध्ये घडलेल्या एका भीषण सत्य घटनेवर आधारित आहे. २ तास ३ मिनिटांचा हा तमिळ चित्रपट सध्या हिंदी, मल्याळम, तेलुगू आणि इंग्रजीमध्येही उपलब्ध असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मिथुन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गोमती शंकर, मायकल थंगदुराई आणि स्मृती व्यंकट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा स्टीफन नावाच्या एका शांत मुलाभोवती फिरते, ज्याच्या साध्या राहण्यामागे बालपणीच्या वेदनादायी आठवणी दडलेल्या असतात. जेव्हा परिसरात गूढ हत्यांचे सत्र सुरू होते, तेव्हा एक पोलीस अधिकारी आणि मानसोपचारतज्ज्ञ स्टीफनच्या आयुष्यातील गुपिते शोधण्याचा प्रयत्न करतात. शांत दिसणाऱ्या चेहऱ्यामागे दडलेला क्रूर भूतकाळ उलगडतानाचा थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. विशेषतः या चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका धक्कादायक आहे की, तो पाहताना प्रेक्षक थक्क होतात.




