इंधन बचतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनीही त्याची दखल घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दुचाकीवरून विधान भवनात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री स्वतः ‘रॉयल एनफिल्ड 350’ चालवत विधान भवनात पोहोचले, तर त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले कर्मचारी आणि ताफाही दुचाकींवर दिसून आला. इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या अनोख्या प्रवासाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असतानाच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी संबंधित बुलेट मोटारसायकलीची कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर करत वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचा दावा केला. सरकार इंधन बचतीचा संदेश देत असताना नियमांचे पालन झाले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या आरोपांनंतर भाजपकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितले की, संबंधित वाहनाची सर्व तपासणी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि सर्व्हर बंद असल्यामुळे पीयूसी प्रमाणपत्राचे ऑनलाइन अपडेट वेळेत दिसून आले नाही. काँग्रेसकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. काहींनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले, तर काहींनी नियमपालनाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. इंधन बचतीच्या संदेशासोबतच आता या बुलेटच्या पीयूसीवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापल्याचे दिसत आहे.




