Devendra Fadnavis On Uddhav Thackeray :’मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण?’; विमान प्रवासातील ‘हतबलते’च्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचे ठाकरेंना सडेतोड उत्तर

spot_img

‘त्या’ भेटीवर राजकारण दुय्यम; विमानात ओटीटी सिरीज पाहत होतो, मुख्यमंत्र्यांचा रंगलेल्या चर्चांवर खोचक टोला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील एकाच विमानातील प्रवासाची सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विमान प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड हतबल दिसत होते आणि त्यांचे पंख छाटले जात असल्याचे त्यांना कळून चुकले आहे, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. ठाकरेंच्या या विधानावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली थेट आणि तितकीच मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. “मी तर एक मनुष्य आहे, मला पंखच नाहीत; मग माझे पंख छाटणार तरी कोण?” असा प्रतिसवाल करत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या दाव्यातील हवा काढून घेतली.

रविवार, २८ जून रोजी वाढवण बंदराच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या हायप्रोफाईल विमान प्रवासातील अंतर्गत घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. ठाकरेंच्या हतबलतेच्या आरोपावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “विमानात ते एका कोपऱ्यात बसले होते, तर मी दुसऱ्या बाजूला होतो. विमानात बसल्यापासून ते उतरेपर्यंत मी सवयीनुसार माझ्या मोबाईलवर डाऊनलोड केलेला सिनेमा आणि ओटीटीवरील एक वेब सिरीज पाहण्यात व्यस्त होतो. मी संपूर्ण वेळ सिरीज पाहत असताना माझी कथित हतबलता त्यांना कुठे दिसली, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत म्हटले, “माझ्या पाठीशी राज्यातील १४ कोटी जनतेचा आणि माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा भक्कम आशीर्वाद आहे, त्यामुळे मला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरेंनी माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या ‘सदिच्छा’ मी स्वीकारतो. मात्र, अशाच सदिच्छा त्यांनी २०१९ मध्ये दाखवल्या असत्या तर आज राज्याचे चित्र पूर्णपणे वेगळे असते. जर आम्ही विमानात अगदी शेजारी बसलो असतो, तर नक्कीच गप्पा मारल्या असत्या. हा प्रवास केवळ एक योगायोग होता.”

देशात सध्या ‘ऑपरेशन देवेंद्र’ राबवले जात असल्याच्या ठाकरेंच्या दाव्यावरही मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दांत उत्तर दिले. “माझ्यासाठी असे राजकीय प्रश्न नेहमीच दुय्यम असतात. राजकीय चिखलफेकीने कोणाचेही भले होत नाही. मी केवळ जनतेच्या कल्याणाचा आणि विकासाचा विचार करतो,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरी आणि खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दोन नेत्यांच्या भेटीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तरावर आता उद्धव ठाकरे काय पलटवार करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ