Vaibhav Khedkar on Uday Samant : उदय सामंतांच्या ‘त्या’ स्टेटसवरून भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, “गुवाहाटीला फडणवीसांचा फोन आला नसता तर…”

spot_img

विमानातील ठाकरे-फडणवीस प्रवासावर सामंतांची पोस्ट; शिंदे गट फोडण्याच्या जुन्या चर्चांवरून भाजप नेत्याची कोंडी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या नवनवीन फेऱ्या पाहायला मिळत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र विमान प्रवासाच्या पार्श्वभूमीवर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठेवलेल्या एका व्हॉट्सॲप स्टेटसमुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सामंत यांच्या या सूचक स्टेटसवरून भाजप नेते वैभव खेडकर यांनी त्यांना थेट शब्दांत डिवचले असून, “गुवाहाटीच्या उठावाच्या वेळी शेवटच्या क्षणाला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला नसता, तर उदय सामंत आज या ठिकाणी (महायुतीत) नसते,” असा खळबळजनक दावा खेडकर यांनी केला आहे. भाजपच्या गोटातूनच झालेल्या या थेट हल्ल्यामुळे शिंदे गटात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण वादाची सुरुवात उदय सामंत यांच्या एका सोशल मीडिया स्टेटसमुळे झाली. सामंत यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर, “योग्य लोकांचे हात हातात असतील, तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही,” असे वाक्य लिहिले होते. ठाकरे आणि फडणवीस यांच्या विमान प्रवासानंतर आलेल्या या स्टेटसचे अनेक राजकीय अर्थ काढले गेले. यावर भाष्य करताना भाजप नेते वैभव खेडकर म्हणाले की, “उदय सामंत यांनी अतिशय योग्य व्यक्तीचा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचा हात धरला आहे. मंत्री सामंतच नव्हे, तर राज्यातील प्रत्येक तरुण कार्यकर्त्याला फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावेसे वाटते.” खासदार संजय राऊतांनी यापूर्वी ‘सामंत हे शिंदे सेना फोडणार होते आणि ते भाजपच्या अत्यंत जवळचे आहेत’ असा दावा केला होता, त्या पार्श्वभूमीवर खेडकर यांच्या या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दुसरीकडे, आपल्या स्टेटसवर वाढता वाद पाहून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः समोर येत यावर स्पष्टीकरण दिले आहे. सामंत यांनी मिश्कीलपणे सांगितले की, “या स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा व्हावी, म्हणूनच मी ते मुद्दाम ठेवले होते. मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय व वैयक्तिक बॉण्डिंग अत्यंत घट्ट आणि विलक्षण आहे. त्यामुळे विमानात दुसरे कोणी बाजूला बसले तरी या बॉण्डिंगमध्ये कोणताही फरक पडणार नाही.”

विमानातील प्रवासाचा संदर्भ देत सामंत पुढे म्हणाले, “त्या प्रवासात देवेंद्र फडणवीस एका खिडकीपाशी बसले होते, तर उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूच्या खिडकीपाशी होते. त्यांच्यामध्ये मधली सीट पूर्णपणे रिकामी होती. अशा स्थितीत दोघांमध्ये कोणतीही गुप्त चर्चा होणे शक्यच नाही. विरोधकांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचे उत्तर मिळावे म्हणूनच मी ते स्टेटस ठेवले होते.” सामंत यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी महायुतीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये रंगलेल्या या कलगीतुऱ्यामुळे राजकीय वर्तुळातील तापमान मात्र चांगलेच वाढले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ