Uddhav Thackeray : पक्षातील दुसऱ्या मोठ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे ‘ॲक्शन मोड’मध्ये

spot_img

‘मातोश्री’बाहेर पडून थेट मैदानात उतरण्याची ठाकरेंची नवी रणनीती; डॅमेज कंट्रोल आणि ‘ऑपरेशन फडणवीस’ उघड करण्याचे शिवसैनिकांना आदेश!

शिवसेना आणि ठाकरे कुटुंबासमोर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले राजकीय वादळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या ऐन तोंडावर पक्षात दुसरी मोठी फूट पडली असून, ठाकरे गटाचे ६ खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. या धक्कादायक राजकीय भूकंपामुळे ठाकरे सेना संपली, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मात्र, या आव्हानाला थेट भिडण्यासाठी उद्धव ठाकरे आता ‘मातोश्री’च्या बाहेर पडले आहेत. बंडखोर खासदारांनी जिथे दगा दिला, थेट त्याच मतदारसंघात जाऊन जनसभांचा धडाका लावण्याचा आक्रमक पवित्रा ठाकरेंनी घेतला असून, खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या या झंझावाती दौऱ्यांमागे एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली चतुःसूत्री रणनीती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या सभांमागे प्रामुख्याने चार मोठी उद्दिष्ट्ये आहेत. पहिले उद्दिष्ट म्हणजे ‘डॅमेज कंट्रोल’. मोठा नेता गेल्यावर स्थानिक पातळीवरील फळी फुटू नये, यासाठी “खासदार गेला तरी पक्षप्रमुख पाठीशी आहे” हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांना दिला जात आहे. दुसरे म्हणजे, ही फूट वैचारिक मतभेदांमुळे नसून केवळ सत्तेच्या मोहापोटी आणि भीतीने झाली आहे, हे मतदारांना पटवून देणे. तिसऱ्या रणनीतीनुसार, खासदारांअभावी निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी निष्ठावंत आमदारांवर आणि तरुण नेतृत्वावर मतदारसंघाची धुरा सोपवली जात आहे. तर चौथे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे, या फुटीचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असून भाजपला महाराष्ट्रातून ठाकरेंचे नाव पुसायचे आहे, हा नॅरेटिव्ह कार्यकर्त्यांच्या मनात ठामपणे बिंबवणे.

मात्र, उद्धव ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेचे कौतुक होत असले, तरी राजकीय विश्लेषक एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत आहेत. हीच तत्परता, आक्रमकता आणि लोकप्रतिनिधींशी थेट संवाद जर उद्धव ठाकरेंनी पहिल्या फुटीच्या वेळी किंवा त्यापूर्वी दाखवला असता, तर कदाचित आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आजचे राजकारण हे फेसबुक लाईव्ह किंवा घरातून चालणारे नसून, त्यासाठी २४ तास मैदानात राहावे लागते, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या ‘ग्राऊंड कनेक्ट’च्या माध्यमातून वारंवार सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री असताना आणि कोरोना काळात उद्धव ठाकरेंना काही मर्यादा नक्कीच होत्या, परंतु संवाद वाढवला असता तर बंडखोरांचे धाडस झाले नसते, असे मत सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

‘देर आए दुरुस्त आए’ या उक्तीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आता घेतलेला मैदानात उतरण्याचा निर्णय त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी संजीवनी ठरू शकतो. मात्र, हा संघर्ष लांब पल्ल्याचा असून निवडणुका अजून दूर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हा आक्रमक बाणा आणि मतदारांशी असलेला संवाद यापुढेही अखंड चालू ठेवणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर त्यांनी हा झंझावात असाच कायम ठेवला, तर आगामी निवडणुकांमध्ये बंडखोर खासदारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरून पराभूत करणे ठाकरे सेनेला शक्य होईल. पण जर या सभा काही दिवसांपुरत्याच मर्यादित राहिल्या, तर मात्र विरोधकांचे फावेल आणि पक्षाची गळती थांबवणे कठीण होईल, अशी चिन्हे आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ