NEET 2026 Exam : NEET 2026 परीक्षेची नवी तारीख जाहीर, 21 जूनला पुन्हा होणार परीक्षा

spot_img

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे मोठ्या वादात सापडली आहे. 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या या परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनी देशभरात खळबळ उडाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन केंद्र सरकारने तपास सीबीआयकडे सोपवला असून, प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परीक्षा प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली. त्यानंतर अखेर 3 मे रोजी झालेली NEET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली असली तरी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

CBI तपासादरम्यान राजस्थान, हरियाणा, नाशिक, अहिल्यानगर आणि लातूर येथून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचे समोर आले आहे. नाशिकपासून राजस्थान आणि हरियाणापर्यंत पेपरफुटीचे जाळे कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा आयोगाने विद्यार्थ्यांना दिलासा देत NEET 2026 परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. आता ही परीक्षा 21 जून 2026 रोजी देशभरात पुन्हा घेतली जाणार आहे. नव्या परीक्षेदरम्यान कोणतीही गैरप्रकाराची घटना घडू नये यासाठी सुरक्षा आणि तांत्रिक पातळीवर विशेष उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, तपासाची दिशा आणि पुढील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ