राकेश बापटपासून ते युवराज सिंहपर्यंत; लग्नाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचून का तुटली शमिताची नाती?
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअरमध्ये यशाची शिखरे सर केली, मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांना जोडीदाराची साथ लाभली नाही. याच यादीतील एक आघाडीचे नाव म्हणजे अभिनेत्री शमिता शेट्टी. बहीण शिल्पा शेट्टीने बॉलिवूड आणि वैयक्तिक आयुष्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असले, तरी शमिताच्या वाट्याला मात्र संघर्षाचे दिवस आले. आज वयाची ४६ वर्षे ओलांडली असली तरी शमिता अद्याप अविवाहित असून ती तिचे आयुष्य ‘किंग साईज’ जगताना दिसते. मात्र, तिच्या या एकटेपणामागे अनेक अपयशी ठरलेल्या नात्यांची एक मोठी साखळी असल्याचे समोर आले आहे. शमिताचे नाव चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांपासून ते क्रिकेटच्या मैदानावरील स्टार्सपर्यंत जोडले गेले.
शमिता शेट्टीच्या प्रेमप्रकरणांच्या यादीत सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे अभिनेता उदय चोप्रा. ‘मोहब्बतें’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचे बोलले जाते. त्यानंतर अभिनेता राकेश बापट याच्यासोबत ‘बिग बॉस’च्या घरात फुललेले तिचे प्रेम जगजाहीर होते. चाहत्यांना वाटले होते की हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकेल, मात्र सोशल मीडियावर जाहीर घोषणा करून दोघांनी आपले रस्ते वेगळे केले. याशिवाय शमिताचे नाव ‘चॉकलेट बॉय’ आफताब शिवदासानी आणि हर्मन बावेजा यांच्याशीही जोडले गेले होते. विशेष म्हणजे, केवळ बॉलिवूडच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याच्यासोबतही शमिताच्या अफेअरच्या चर्चांनी एकेकाळी मीडियात मोठी खळबळ उडवून दिली होती.
इतक्या लोकप्रिय आणि प्रतिभावान व्यक्तींना डेट करूनही शमिताचे एकही नातं लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. काही ठिकाणी स्वभाव जुळला नाही, तर काही ठिकाणी परिस्थितीने घात केला, असे विविध तर्क लावले जातात. आज जरी ती रुपेरी पडद्यापासून काहीशी लांब असली, तरी सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय आहे. ४६ व्या वर्षीही तिचा फिटनेस आणि ग्लॅमर पाहून चाहते थक्क होतात. आयुष्यात इतक्या चढ-उतारांचा सामना करूनही शमिताने स्वतःला खंबीरपणे सावरले असून, “लग्नाशिवायही आनंदी राहता येते” हेच जणू ती आपल्या कृतीतून जगाला दाखवून देत आहे.




