कल्याणजवळील मोहने परिसरात राहणारा लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर Prem Bhati याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने परिसरासह सोशल मीडिया विश्वात शोककळा पसरली आहे. पत्नीला माहेरी सोडल्यानंतर प्रेम शनिवारी रात्री उशिरा आपल्या घरी परतत होता. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास तो मोहने परिसरात पोहोचला होता. घर अगदी जवळ आले असताना त्याच्या वडिलांनी त्याला फोन करून तो कुठपर्यंत पोहोचला याची विचारपूस केली. त्यावेळी प्रेमने आणखी दहा मिनिटांत घरी पोहोचणार असल्याचे सांगितले होते. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर पडलेल्या खडींवरून त्याची दुचाकी अचानक घसरली. या अपघातात तो जोरात रस्त्यावर पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे भाटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यांच्या निकृष्ट अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर विखुरलेल्या खडींमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करत संबंधित प्रशासन आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी होत आहे. काही सामाजिक संघटनांनीही या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
प्रेम भाटी सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर हजारो फॉलोअर्स होते, तर यूट्यूबवरही त्याने मोठा प्रेक्षकवर्ग तयार केला होता. विनोदी आणि मनोरंजक व्हिडीओंमुळे त्याने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्याच्या अकाली निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले आहे.




